अवकाळी व गारपिटीने उध्वस्त झालेल्या पिकाची तात्काळ नुकसान भरपाई द्या - ॲड रेवण भोसले
धाराशिव दि: 29- मराठवाडा, विदर्भ, उत्तर व मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने ज्वारी, मका, तूर, हरभरा ,कांदा, कापूस, ऊस ,पपई व भाजीपाल्यासह फळबागा उध्वस्त झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाच्या अवक्रपेने हिरावून घेतला असून कृषी विभागाला नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाने आदेश द्यावेत तसेच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना उध्वस्त झालेल्या पिकांची तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राज्यातील लाखो हेक्टर मधील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटामुळे मराठवाडा ,विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. राज्यातील शेतकरी वर्ग अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्याने आक्रोश करीत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शासनाने तात्काळ पंचनामे करणे गरजेचे आहे .त्यातच अनेक ठिकाणी शेतपिकाबरोबरच, घरांचे, पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जोरदार अवकाळी पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने रब्बीसह फळबाग, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे .त्यामुळे अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून नियम, अटी, पंचनामे हे सोपस्कार पार पाडण्या कामी अधिक वेळ न घालवता शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी 40 हजार रुपये तर बागायती शेतीसाठी 80 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही ॲड भोसले यांनी केली आहे.
0 Comments