शेताचा ताबा न देता जातीवाचक अपमान; शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर एकावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा-Crime News
धाराशिव प्रतिनिधी : शेती विक्रीचे संपूर्ण पैसे घेऊनही शेताचा ताबा न देणे, वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करणे आणि मानसिक त्रास दिल्याने एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग मारुती सातपुते (वय 46, रा. पिंपरी बे., ता. जि. धाराशिव) यांनी दि. 31 जुलै 2026 रोजी रात्री 8 ते 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान शाहूराज करवार यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी योगेश महादेव गरड (रा. पिंपरी बे., ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, आरोपीने पांडुरंग सातपुते यांच्याकडून शेती विक्रीचे संपूर्ण पैसे घेतले होते. मात्र, पैसे स्वीकारूनही शेताचा प्रत्यक्ष ताबा दिला नाही. तसेच, वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून "तुझी काय लायकी आहे?" अशा शब्दांत अपमानित करत मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
या सततच्या मानसिक छळाला कंटाळून पांडुरंग सातपुते यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नी अनिता पांडुरंग सातपुते (वय 40, रा. पिंपरी बे., ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
अनिता सातपुते यांनी दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 329(3), 351(1), 351(2), 352 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम 3(1)(आर)(एस) व 3(1)(एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा सखोल तपास केला जात आहे.

0 Comments