भारतमातेच्या रक्षणासाठी चिंचोलीचा वीरपुत्र शहीद! अग्निवीर करण सरवदे यांचे अरुणाचल प्रदेशात सर्वोच्च बलिदान; तुळजापूर तालुक्यावर शोककळा
तुळजापूर : देशाच्या सीमेचे रक्षण करताना मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणारे तुळजापूर तालुक्यातील चिंचोली गावचे सुपुत्र वीर अग्निवीर करण काशिनाथ सरवदे हे अरुणाचल प्रदेश येथे शहीद झाले. भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या शहीद होण्याच्या वृत्ताने चिंचोली गावासह संपूर्ण तुळजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय सैन्यदलात दाखल झालेल्या करण सरवदे यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले. भारताच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करताना त्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळे चिंचोली गावाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.
वीर जवान करण सरवदे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातील नागरिकांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या या वीर जवानाचे योगदान देशवासीयांच्या सदैव स्मरणात राहील.
वीर जवान करण काशिनाथ सरवदे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांच्या शौर्याची गाथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
भारत मातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.
अमर रहे! वीर जवान करण सरवदे अमर रहे!
आपला - बालाघाट न्यूज टाइम्स

0 Comments