नाईचाकूर प्रतिनिधी: उमरगा तालुक्यातील नाई चाकूर येथे स्वातंत्र्य सेनानी शाहू - गोविंद सार्वजनिक वाचनालयाच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गावातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. प्रतिवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावातील गुणवंताचा सत्कार केला जातो यावर्षी दि,२६ रोजी महादेव कुत्रोबा मंदिराच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा येथील प्रसिद्ध ग्रामीण कवी कमलाकर भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच चंद्रकांत स्वामी, तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच बी. के. पवार , जगदंबा देवी ट्रस्ट चे अध्यक्ष रावसाहेब पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोपाळ पवार उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार समारंभ सहपरिवार करण्यात आला. यामध्ये आपले सासरे कै.दिगंबर वनकुद्रे, यांच्या प्रथम पुण्यतिथीचा खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेला पुस्तके भेट देण्यात आलेल्या अश्विनी वनकुद्रे व त्यांचा परिवार, कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती झालेले रत्नदीप पंडित, केंद्रीय फेलोशिप प्राप्त डॉ. माधव माने, नारंगवाडी येथील नऊशे वर्षांपूर्वीची बारव पुनर्जीवित करणारे विठ्ठल चिकुंद्रे व त्यांचे मित्र मंडळ, नूतन संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, नूतन जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष सौ. सत्यवती इंगळे, नीट परीक्षेमध्ये ६३७ गुण प्राप्त करणारी संचिता पवार व दहावी बारावी परीक्षेत प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गावातील व्यसनमुक्ती झालेल्या दोन नागरिकांचा येथोचित सन्मान करण्यात आला. नाईचाकूर गावामध्ये मागील वीस वर्षापासून सुरू केलेली ही परंपरा अविरत सुरू आहे आणि गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रेरणा देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा हणमंत पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार हरिदास बाबळसुरे यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, माता भगिनी, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत.
0 Comments