सोलापुर :भरधाव मालट्रक खाली चिरडून सहा शेतमजूर महिला जागीच ठार, कटफळ गावावर शोककळा ट्रक चालक अटकेत
सोलापूर : शेतातील मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एहाटी बसची वाट पाहात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील २० चाकी मालमोटारीने जोरात ठोकरल्याने घडलेल्या भीषण अपघातात सहा महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला जखमी झाल्या.
अश्विनी शंकर सोनार (वय ३२), इंदुबाई बाबा इरकर (वय ५०), कमल यल्लाप्पा बंडगर (वय ४८), सुलोचना रामचंद्र भोसले (वय ४२), श्रीमाबाई लक्ष्मण जाधव (वय ४५) आणि मनीषा आदिनाथ पंडित (वय ३२) अशी या भीषण अपघातात जागीच मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिला शेतमजुरांची नावे आहेत. तर सिंधुबाई रघुनाथ खरात (वय ४६) आणि नीताबाई दत्तात्रय बंडगर ( वय ४८) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावाजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील राहणाऱ्या आठ महिला शेतमजूर ऊस लागवडीसाठी चिकमहूद गावाखालील बंडगरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात दि, १८ रोजी सकाळी नऊ वाजता आल्या होत्या. चिकमहुद व कटफळ हे सहा किलोमीटर अंतर आहे ऊस लागवड करून सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावी परत जाण्यासाठी पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूदजवळ बंडगरवाडी येथे रस्त्याच्या कडेला या आठ महिला शेतमजूर एसटीची वाट पाहात थांबल्या होत्या. परंतु पंढरपूरहुन कराडला जाणारी चौदा चाकी मालमोटारीने (एमएच ५० एन ४७५७) वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांना जोरात ठोकरले. अपघात घडताच तेथे गोंधळ उडाला. स्थानिक तरूणांनी मदतकार्य केले.मालमोटारचालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.
हा अपघात इतका भयानक होता की एका महिलेचा टायर मध्ये अडकून मृत्यू झाला तर उर्वरित पाच महिला ह्या एकमेकीपासून वीस ते तीस फुटाच्या अंतरावर फरपटत मृत्युमुखी पडल्या. अपघात घडताच जोराचा आवाज होऊन गोंधळ उडाला, स्थानिक तरुणांनी मदत कार्य हाती घेतले.. मालट्रक चालक सुरज रामचंद्र वीर यास पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भगवानराव खणदाळे, यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मयत सहा महिलावर त्यांच्या गावी दिनांक २० रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे तर कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.
0 Comments