मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा आता वर्षाला १५००० हजार रु मिळणार
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आता वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार दि, २४रोजी केली आहे.
शेतकऱ्यांना लवकरच पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीतून वार्षिक १२ ऐवजी १५ हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.२४) केली आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या १९ व्या हप्त्याचं वितरण सोहळ्या निमित्त वसंतराव नाईक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, "पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून १२ हजार रुपये दिले जातात. परंतु त्यामध्ये आता तीन हजार रुपयांची अतिरिक्त भर टाकली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये दिले जाणार आहेत." अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला.
फडणवीस पुढे म्हणाले, "नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर विरोधक सुरुवातीला टिका करत होते. हस्यास्पद टिका टिपणी करत होते. परंतु शेती व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात काहींच्या मते थोडीशी असलेली ही रक्कम मोठा दिलासा ठरली आहे." असा दावाही फडणवीसांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहार येथील भागलपुरमध्ये पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. यामध्ये १९ व्या हप्त्याचे ९ कोटी ८० शेतकऱ्यांच्या खात्यावर २२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. याच कार्यक्रमाला फडणवीस यांनी ऑनलाईन हजेरी लावली. या कार्यक्रमानिमित्त त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. पोकराच्या २ टप्प्यासाठी ६ हजार कोटी रुपये दिले असून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील गावांची निवड यासाठी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता १५ हजार रुपये करण्याचं आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिलं होतं. परंतु निवडणुकीनंतर त्यावर मौन बाळगण्यात आलं. आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीएम किसान ६ आणि नमोचे ६ हजार अशी एकूण १२ हजारांमध्ये ३ हजारांची भर घालण्याची घोषणा केली आहे.
0 Comments