तब्बल १९ वर्षांनी आले एकत्र, जुन्या वर्गमित्रांची पुन्हा भरली शाळा! जुन्या आठवणींना मिळाला उजाळा-Tuljapur Aapshinga get together Function Celebrate

Hot Posts

6/recent/ticker-posts

तब्बल १९ वर्षांनी आले एकत्र, जुन्या वर्गमित्रांची पुन्हा भरली शाळा! जुन्या आठवणींना मिळाला उजाळा-Tuljapur Aapshinga get together Function Celebrate

तब्बल १९ वर्षांनी आले एकत्र, जुन्या वर्गमित्रांची पुन्हा भरली शाळा! जुन्या आठवणींना मिळाला उजाळा-



नरेंद्र आर्य विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन :
२००६ मधील दहावीची बॅच : शिक्षकांचा केला सन्मान

धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे   :अरे कसा आहेस. अय्या ओळखलंच नाही. तब्येत काय म्हणतेय. अगं कुठे असतेस. मिस्टर काय करतात. मुले किती आहेत. दहावीनंतर पुढे काय केले. ती आली नाही का. तो कुठे असतो. ती सध्या काय करतेय. नोकरी काय म्हणतेय. भावोजी काय करतात. वहिनी कुठल्या आहेत आणि त्या काय करतात. तुझा व्यवसाय कसा चालला आहे. शेती काय म्हणतेय. गावाकडे आल्यावर कोणी भेटतं का. सध्या काय चाललंय. तुला तो आठवतो का. हा तोच तो. असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना विचारत आणि सुख-दुःखाचे प्रसंग सांगत तालुक्यातील मौजे.आपसिंगा येथील नरेंद्र आर्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी तब्बल एकोणीस वर्षांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला. निमित्त होते शाळेच्या २००६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. यावेळी सर्वांनी एकमेकांची आस्थेने विचारपूस केली. तसेच सर्वांच्या वतीने सौर ऊर्जा कॅमेरा मोठ्या आनंदाने भेट देण्यात आला.  

स्थानिक माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने या स्नेहमेळाव्याचे सुंदर असे आयोजन करण्यात आले होते. नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले माजी विद्यार्थी आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या व राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थिनी यांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींना संपर्क करून हा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये लातूर, धाराशिव, सोलापूर, हैद्राबाद व पुणे जिल्ह्याच्या परिसरातून सुमारे ५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित सर्व गुरूजनांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन येथोच्छित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेकांनी शाळेसह जीवनातील अनुभव ते आजपर्यंतचा जीवन प्रवास शब्दात उलगडला. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने अनेकजण गहिवरले.

'अशी पाखरे येती... आणि स्मृती ठेवूनी जाती' या काव्य पंक्तीप्रमाणे शालेय जीवनात अनेक बॅचनी पाचवी ते दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. कोणी पुढील शिक्षणासाठी, नोकरी किंवा व्यवसायासाठी पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणी निघून गेले. तरीही शालेय जीवनातील मित्रांसोबतच्या आठवणी मात्र काढत राहिले. याच जुन्या आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा देण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल १९ वर्षांनी एकत्र येत हा आठवणीपर स्नेहमेळावा आयोजित केला. एक महिना अगोदर बॅचच्या व्हाटसअप ग्रुपवर तारीख ठरवून आपल्या नोकरी, व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून कोणी धाराशिव, लातूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून आतुरतेने शाळेत जुन्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी हजर राहिले. प्रारंभी सर्वांनी फेटे बांधून कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच पूर्ण दिवस आनंदात घालवला. यावेळी शालेय जीवनातील शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करुन विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध अधिक घट्ट केले.

दरम्यान, या दहावीच्या बॅचने केलेल्या उत्कृष्ट स्नेहमेळावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे इतरही बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा घेण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयराज सुर्यवंशी यांनी अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी शिक्षक बाळकृष्ण गोरे, तुकाराम गोरे, सुमित्रा खंदारे, शरद गोरे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर सिरसाठ, अर्जुन गोरे, ज्ञानेश्वर हेडे, शंकर गिरी, सुनील क्षीरसागर, शक्ती पांडागळे, समाधान पारधी, चंद्रकांत सोनवणे, नाना गादे आणि राहुल गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.  


...तर जिलेबीने आणली भोजनात रंगत, गोड झाली सर्वांची पंगत!

मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत ताई हजारे यांच्या वतीने स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वांसाठी गरमागरम चपाती, पनीर, जिरा राईस, भजी, पापड आणि स्वीटमध्ये जिलेबी, अशा स्वादिष्ट व रूचकर भोजणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मनोगते व्यक्त करताना पाणावलेल्या डोळ्यांना जिलेबीच्या गोडव्याने दिलासा दिला. परिणामी, सर्वांनी जिलेबीचा भरपेट आस्वाद घेतला. त्यामुळे जिलेबीने आणली भोजनात रंगत, गोड झाली सर्वांची पंगत! असे अमोल कांबळे यांनी म्हणताच त्यांना सर्वांनी हसून दाद दिली.


जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीसाठी यांनी घेतला पुढाकार!

काही वर्षांपूर्वी माजी विद्यार्थ्यांनी व्हाटसअप ग्रुप काढला. यामध्ये जवळपास सर्व माजी विद्यार्थी सामील झाले. या माध्यमातून संवाद साधत होते. एकमेकांच्या सुख दुःखात सोबत होते. परंतु नोकरीच्या, व्यवसायाच्या व्यापामुळे स्नेहमेळाव्याचे नियोजन होत नव्हते. यावर्षी एक महिना अगोदर तारीख ठरवून सर्वांनी एकत्र भेटायचे ठरवले. त्यामुळे सागर सिरसाठ, अर्जुन गोरे, अमोल कांबळे, रेहान काझी, सौदागर गायकवाड, आशा हजारे, राणी तोडकरी, शुभांगी इंगळे, सुकुमार माने, सुषमा घोलकर, सुवर्णा जमदाडे, सारीका रोंगे, अश्विनी कुंभार, पल्लवी सगरे, श्रीदेवी गोरे, रेणुका अंदाने, अमरजा क्षीरसागर आणि उज्ज्वला खोचरे यांनी पुढाकार घेतला. परिणामी, तब्बल १९ वर्षांनी त्याच जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा योग आला.


विद्यार्थ्यांची भावुक मनोगते, सन्मानामुळे शिक्षक भारावले!

शिक्षकांचे मार्गदर्शन आणि उत्तम ज्ञानदानामुळे हे सर्व विद्यार्थी उद्योग-धंदा, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शेती, शासकीय सेवेसह विविध खासगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असल्याने शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यामुळे शिक्षक सुद्धा अगदी भरावून गेले. तसेच त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षणाचे महत्त्व आधोरेखित केले.

Post a Comment

0 Comments