सोयाबीनच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे ३ लाखांचे नुकसान, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल- धाराशिव जिल्ह्यातील घटना
धाराशिव प्रतिनिधी : तालुक्यातील तेर शिवारात एका शेतकऱ्याने कष्टानं पिकवून आणि कापणी करून रचून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावून खाक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण भागवत कदम (वय ५१ वर्षे, रा. तेर) यांचे तेर शिवारात शेत गट क्रमांक ४१० मध्ये शेत आहे. त्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची काढणी करून त्याची गंज लावून ठेवली होती. रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपासून ते सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या दरम्यानच्या काळात अज्ञात व्यक्तीने या सोयाबीनच्या गंजीला आग लावली.
या लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले असून, शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या वेळेस वर्षभराची मेहनत डोळ्यांदेखत जळून खाक झाल्याने कदम कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.
याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मण कदम यांनी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) ढोकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास ढोकी पोलीस करत असून, परिसरात या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

0 Comments