भजन-कीर्तनातून वारकरी सेवेची धुरा वाहणाऱ्या युवा मृदंगाचार्याचा सर्पदंशाने दुर्दैवी अंत-Naldurg Live News
अवघ्या २२व्या वर्षी काळाचा घाला; वागदरीवर शोककळा, वारकरी सांप्रदायिक चळवळीतील उमदे युवा नेतृत्व हरपले
नळदुर्ग, दि. ६ ऑक्टोबर : प्रतिनिधी
वारकरी सांप्रदायिक चळवळीत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून सेवा बजावत अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वागदरी (ता. तुळजापूर) येथील युवा मृदंगाचार्य व अभंग गायक रुपेश नागनाथ चव्हाण ऊर्फ लखन (बंटी) यांचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या २२व्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनाने वागदरी परिसरासह वारकरी सांप्रदायिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
रुपेश चव्हाण यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती व्यवसायात वडिलांना हातभार लावत असतानाच वारकरी संप्रदायाच्या सेवेला प्राधान्य दिले होते. भजन, कीर्तन आणि मृदंगवादनाची त्यांना विशेष आवड होती. उत्कृष्ट मृदंगवादक तसेच प्रभावी अभंग गायक म्हणून त्यांनी अल्पावधीतच परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
सोमवारी रात्री दि,५ रोजी अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे आयोजित भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमात त्यांनी उत्साहाने सेवा बजावली. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत वारकरी परंपरेचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य त्यांनी सुरू ठेवले होते.
शेतात विश्रांती घेत असताना सर्पदंश
मंगळवारी दि,६ रोजी दुपारी वागदरी शिवारातील शेतात झाडाखाली विश्रांती घेत असताना विषारी नागाने रूपेश चव्हाण यांना दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
रूपेश यांच्या अकाली निधनामुळे वारकरी सांप्रदायिक चळवळीतील एक होतकरू आणि गुणी युवा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भजन-कीर्तन क्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
वारकरी चळवळीतील उमदे नेतृत्व हरपले
रूपेश चव्हाण हे केवळ मृदंगवादक आणि अभंग गायक म्हणून नव्हे, तर वारकरी परंपरेशी मनापासून जोडलेले युवा म्हणून परिचित होते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन सेवा बजावण्याची त्यांची धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी होती. त्यांच्या निधनाने वागदरी परिसरातील वारकरी चळवळीतील एक उत्साही युवा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
उद्या वागदरीत अंत्यसंस्कार
रूपेश चव्हाण यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता वागदरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच वागदरीसह परिसरातील नागरिक, वारकरी, भजन-कीर्तन मंडळी आणि मित्रपरिवारातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

0 Comments