Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरावस्था , भाविकांसह नागरिकांची मोठी गैरसोय, संबंधित बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष



चिवरी/बालाघाट न्युज टाइम्स: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या  दोन्ही बाजूनी गावजोड जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे, पावसाळ्यात तर या रस्त्याला डबक्याचे  स्वरूप आले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? असा प्रश्न वाहन चालकासह प्रवाशांना पडत आहे.  येथील लक्ष्मी नगर ते , नळदुर्ग तुळजापूर रोडला जोडणाऱ्या चिवरी पाटी या चार किलोमीटर  अंतराच्या रस्त्यावर   जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. श्री चिवरीची महालक्ष्मी म्हणून राज्यासह परराज्यात गावची ओळख आहे मात्र मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही मुख्य गाव जोड रस्त्याची सद्यस्थितीत मोठी दुरावस्था झाली आहे, त्यामुळे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या  हजारो भाविकांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रस्त्यावरील खडी उखडून अस्तावस्त पडली आहे त्यामुळे या भागातील कोरे वस्ती, लक्ष्मी नगर या भागातील शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिकांना रस्त्यावरून पायी जाणेही कठीण होऊन बसले आहे, या उपरोक्त प्रश्न लक्षात घेऊन चिवरी ग्रामपंचायत कडून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी पत्रही दिले आहे परंतु यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.  या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांसह ग्रामस्थांना मागील दोन वर्षापासून या रस्त्यावरील खड्ड्याचे धक्के खातच प्रवास करावा लागत आहे , या खड्ड्यांमुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघातही झाले आहेत आणखीन मोठ्या अपघातांला प्रशासन आमंत्रण देत आहे की काय ? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे . मागील तीन वर्षापासून येथील बस सेवा बंद आहे त्यामुळे जेष्ठ नागरिक ,विद्यार्थीसह भाविकांचे मोठे हाल होत आहे.
वारंवार ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागाला  रस्त्याची  मागणी करूनही रस्ता केला जात नसल्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत या संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थासंह भाविकातून होत आहे.

Post a Comment

0 Comments