Hot Posts

6/recent/ticker-posts

कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य व पराक्रम प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी - कमांडंट ग्रुप कैप्टेन प्रणब पंडा कारगिल विजय दिनानिमित तुळजापुरात शहिदांना मानवंदना

कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य व पराक्रम प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी - कमांडंट ग्रुप कैप्टेन प्रणब पंडा

कारगिल विजय दिनानिमित तुळजापुरात शहिदांना मानवंदना


उस्मानाबाद,दि.२७ :  कारगिल युध्‍दाच्‍यावेळी भारतीय सैन्‍याने अतिशय दुर्गम उंचावरील कठिण डोंगर शिखरावर लपून बसलेल्‍या पाकिस्‍तानी सैन्‍याला हुसकावून लावले आणि आपला भूभाग पुन्‍हा ताब्‍यात घेतला.याचा देशाला सार्थ अभिमान आहे.आम्‍ही त्‍यांना वंदन करतो.कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य व पराक्रम हा प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कमांडंट ग्रुप कैप्टेन प्रणब पंडा यांनी केले.


26 जुलै हा दिवस देशभर ‘कारगिल विजय दिवस’ म्‍हणून साजरा केला जातो.त्‍यानिमित्‍ताने केंद्र सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयच्‍या केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूर आणि श्री.तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर यांच्‍या संयुक्‍त विदयमाने आयोजित शहिदांना मानवंदना कार्यक्रमात श्री.पंडा बोलत होते.


यावेळी मंचावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्‍हाण,प्राचार्य वैजनाथ घोडके,सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव,डॉ.सुभाष पेठकर,सुभेदार मेजर जी एस सोनकांबळे,श्री.रमाकांत स्‍वामी,श्री. भिमा सुरवसे,श्री.रणजीत रोकडे यांची उपस्थिती होती.


 कमांडंट पंडा म्हणाले,कारगिल युद्ध हे जगातील एक कठीण युद्धपैकी एक आहे.८५ दिवस चालेल्या या युद्धाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका,फ्रांस,जर्मनी,व्हिएतनाम सारख्या अनेक देशातून लोक येत असतात.अतिशय उंच असलेल्या डोंगरावर लढलेले हे युद्ध आहे. जवळपास ४ सेक्टरमध्ये हे युद्ध लढले गेले आहे.आजच्या या दिनाचा संकल्प करून विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यामध्ये मोठ्या संख्येने भर्ती व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


 श्री.चव्‍हाण म्‍हणाले,कारगिल विजयदिनाचे स्‍मरण करताना कॅप्‍टन विक्रम बत्रा आणि त्‍यांचे तुकडीचे योगदान हे तरुणांना देशभक्‍ती आणि साहस यांचे प्रतिक शिकवते.जेव्‍हा कॅप्‍टन विक्रम बत्रा एक पर्वत शिखर जिंकून परत आले.त्‍यानंतर त्‍यांचे वाक्‍य प्रसिध्‍द झाले ‘ये दिल मांगे मोर ---' त्‍यांनी तरूणांमध्‍ये देशभक्‍तीची आग पेटवली.पुढच्‍या हल्ल्यात त्‍यांनी प्राणांचे बलिदान दिले.या हल्ल्याचे नेतृत्‍व त्‍यांनी केले होते.या सर्व शहिदांच्‍या शौर्याचे स्‍मरण करून त्यांना मानवंदना देण्याचा हा दिवस असल्‍याचे श्री.चव्‍हाण यांनी सांगितले.


  श्री.घोडके म्‍हणाले,कारगिल विजय दिनाच्‍या निमित्‍याने घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून विदयार्थांना भारतीय सैन्‍यांनी देशासाठी केलेला पराक्रम त्‍यांचे धाडस,शौर्य यांचे धडे पुन्‍हा मिळाले आहेत.यातूनच देशभक्‍त सैनिक तयार होतील,अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.


 कार्यक्रमाच्‍या सुरूवातीला ११ व १२ वी वर्गातील मुलांनी सैनिक शिस्‍तीमध्‍ये उपस्थित मान्‍यवरांचे हस्‍ते शहिदांना मानवंदना देण्‍यात आली. यावेळी इयत्ता ९ वर्गातील विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या परिसरातील पाना-फुलांनी बनवलेल्या पुष्पचक्राने अमर जवानांच्या प्रतिमेला मानवंदना दिली.


  यावेळी घेण्‍यात आलेल्‍या वक्‍तृत्‍व स्पर्धेतील विजेते- सिद्धार्थ गायकवाड, प्रतिक गायकवाड, अमिर अल्लाउद्दीनशेख,संग्राम जाधव आणि चित्रकला स्‍पर्धेच्या लहान गटातील विजेते - सागर धवडे, वैभव कांबळे, श्री गणेश कदम,दत्तराज कोळी, मोठ्या गटातील विजेते - भारत निकम,आशिष भड, शंकर पवार, संग्राम जाधव सोबतच उपस्थित विद्यार्थ्यासाठी कारगिल युद्धावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.


   कार्यक्रमाचे संचालन व आभार रमाकांत स्‍वामी यांनी केले.कार्यक्रम यशस्‍वी करण्यासाठी केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूरचे कार्यालय सहायक जब्‍बार हन्‍नूरे,एस डी खान,श्री लोखंडे,डॉ विजय वडेवराव, देविदास पांचाळ आणि जलील हिपरगी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments