प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचा आज जिल्ह्यात शुभारंभ भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
धाराशिव- देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकर्यांना शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधे, अवजारे आता एकाच छताखाली मिळणार आहेत. त्याकरिता प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे देशभरात सुरू करण्यात आलेली आहेत. राजस्थानमध्ये गुरूवार, दि.27 जुलै रोजी स्वतः प्रधानमंत्री श्री.मोदीजींच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ होणार असून यावेळी ते देशभरातील केंद्र चालकांना संबोधित करणार आहेत. धाराशिव शहरातील जिजाऊ चौक, बार्शीनाका येथील केंद्राचा देखील गुरूवारी सकाळी 11 वाजता शुभारंभ होत असून पहिल्या टप्प्यात जिल्हाभरात एकुण 264 पेक्षा अधिक केंद्रे सुरू करण्यात येत असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशभरात प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांची सुरुवात होत असल्याच्या निमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी बुधवारी (दि.26) धाराशिव येथील समर्थ हॉटेलच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन या योजनेसंदर्भात विस्ताराने माहिती दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.व्यंकटराव गुंड, अॅड.अनिल काळे, अॅड.खंडेराव चौरे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्कप्रमुख रामदास कोळगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, नगर परिषदचे माजी गटनेते युवराज नळे, प्रवीण पाठक, राहुल काकडे व इतर पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष श्री.चालुक्य म्हणाले की, पेरणीच्या वेळी शेतकर्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे, शेती अवजारांसाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये जावे लागते. हे साहित्य शेतकर्यांना एकाच ठिकाणी स्वस्त दरात खरेदी करता यावे याकरिता देशाचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये पेरणीसाठी लागणारे साहित्य, शेती अवजारे, माती परीक्षण, फवारणीसाठी ड्रोन अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
देशामध्ये जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर 2.8 लाख कृषीसेवा केंद्रे आहेत. या केंद्रांचे टप्प्याटप्प्याने प्रधानमंत्री किसान सुविधा केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. सध्या देशभरातील 1 लाखाहून अधिक खते विक्री केंद्रांचे रुपांतर प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये करण्यात आलेले आहे. उर्वरित 1.8 लाख केंद्रांचेही रुपांतर वर्षाअखेरपर्यंत करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 264 पेक्षा अधिक केंद्रांची सुरुवात 27 जुलैपासून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व केंद्रांबाहेरील फलक एकसारखेच राहणार आहेत. तसेच विक्रेत्याचे नाव, जीएसटी क्रमांक, दरफलक, खते, बियाणे व औषधांचा उपलब्ध साठा याचा स्पष्ट उल्लेख राहणार आहे. त्याचबरोबर या केंद्रांमध्ये एटीएम सुविधा, माती, बियाणे, पाणी परीक्षणाची व्यवस्था अथवा परीक्षण केंद्राशी जोडून देण्याची व्यवस्था, कॉमन सर्व्हिस सेंटर अशा विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत.
याकरिता प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकार्यांचेही यावर नियंत्रण राहणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी पदाधिकार्यांचेही त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष राहील, असेही त्यांनी सांगितले.
0 Comments