अखेर दारफळ-सारोळा येथे विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस सुरू; चालक-वाहकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
आ.कैलास पाटील यांच्या निर्देशानंतर धावली बस
२० वर्षांनंतर दारफळमध्ये अवतरली बस; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर.
धाराशिव: तालुक्यातील दारफळ व सारोळा (बुद्रूक) येथे विद्यार्थ्यांसाठी शनिवारपासून (दि.१५) स्पेशल बस सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी धाराशिव-सारोळा ते दारफळ या मार्गावर ही बस धावणार आहे. आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या आदेशानंतर तातडीने ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दारफळ गावात तब्बल २० वर्षांनंतर बस अवतरल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. बस गावात येताच ग्रामस्थांच्या वतीने चालक व वाहकांचा सत्कार करून बसचे पूजन करण्यात आले.
सारोळा व दारफळ येथील विद्यार्थिनींसह विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने दररोज धाराशिव शहरात येतात. सकाळी ६ ते १० या वेळेत शाळा, महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र सारोळा येथून जाणाऱ्या धाराशिव-औसा, कोंड या बसमध्ये प्रवाशी संख्या अधिक असते. बसमध्ये जागा नसल्याने त्या बस गावात थांबविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे दारफळला तर बसच नसल्याने गत अनेक वर्षापासून विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात बसअभावी लेट पोहचावे लागत आहे. तसेच अनेक विद्यार्थी खासगी वाहनाने येतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी सारोळापर्यंत दररोज सकाळी ६.१५ वाजता विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस सोडण्यात यावी, असे निर्देश आ. कैलास घाडगे-पाटील यांनी दिले आहेत. याची तातडीने दखल घेत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी या बसचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने बसचे पूजन करून चालक एस.आर. पाटील व वाहक ए. एन. बनसोडे यांचा सरपंच संजय भोरे व विनोद बाकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते दिपक रणदिवे, प्रकाश घुटे, सुधाकर नागटिळक, हनुमंत इंगळे, बजरंग घुटे, हेमंत सुरु, अक्षय इंगळे, यशपाल ओव्हाळ आदींसह ग्रामस्थांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments