दर महिन्याला बैठक घेऊन आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविणार - महेंद्र कुमार कांबळे
सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रम
रूपेश डोलारे धाराशिव
धाराशिव दि.५ - जिल्ह्यातील आजी- माजी सैनिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमांतर्गत त्यांच्या समस्या सोडविल्या जातात. जिल्हास्तरावर ज्या समस्या सोडविता येतात, त्या समस्यांचा निपटारा केला जात आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी खास दर महिन्याला बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीमध्ये त्यांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असून सर्व आजी-माजी सैनिकांनी आपल्या समस्या या बैठकीत मांडाव्यात असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दि.५ ऑगस्ट रोजी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकाभिमुख कामांचा करूया निपटारा चला करू महसूल सप्ताह साजरा या अंतर्गत सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलै होते. यावेळी महसूलचे अप्पर तहसिलदार निलेश काकडे, उस्मानाबाद तहसीलचे नायब तहसिलदार प्रभाकर मुगावे, तलाठी प्रदीप सोनटक्के, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे, उपाध्यक्ष अशोक गाडेकर, पुनर नियुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव गुंड, सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरिदास शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे म्हणाले की, यापुढे दर महिन्याला सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमासाठी जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्त्वकांक्षी असल्यामुळे देशाची सेवा केलेल्या व करीत असलेल्या आजी -माजी सैनिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. आजच्या बैठकीमध्ये आजी-माजी सैनिकांनी सांगितलेल्या सर्व समस्यांची नोंद घेतली असून आमच्या स्तरावर ज्या समस्या सोडविता येतात, त्या सोडविलेल्या आहेत. त्यामध्ये वारसा प्रमाणपत्र, रजा टाकून आलेले तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथील एसआरपीचे जवान शांतीलाल रोडे यांच्या जमिनीची समस्या तसेच इतरांनी सांगितलेल्या शेत रस्ता व जमिनीचे फेरफार आदी समस्या सोडविल्या व सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शेत रस्त्यावर ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे. ती सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत. त्याबरोबरच नवीन रस्ता देण्यासाठी १४३ ची कारवाई करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच फेरफारची नोंद घेण्यासाठी ज्या ठिकाणी जे अविवाहित व अवारसाचे फेरफार आहेत अशा सर्व प्रकरणांचा येत्या १५ दिवसांच्या आतमध्ये निपटारा करणार असल्याचे सांगितले. यावेळी दीपक शेरखाने, चतुर्वेदी घोलप, जे.जे. जाधव, मंगल हजारे, तुकाराम शिंदे, कालिदास शिंदे, दत्ता सुर्यवंशी, अंकुश हजारे, पी.जी. तांबे, पोपट गजधने, सैनिकांच्या पत्नी आदींसह आजी-माजी सैनिक उपस्थित होते.
0 Comments