सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांची शिबिरातून केली आरोग्य तपासणी,शेकडो महिलांनी घेतला लाभ
उस्मानाबाद,दि.05 स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून 21 ते 28 ऑगस्ट 2023 दरम्यान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनीअंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबीराचे विनामूल्य आयोजन करण्यात आले.सर्व अंगणवाडी सेविका,मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे शिबीर आयोजित करण्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभागांशी समन्वय साधून कृती आराखडा करण्यात आला.त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू तयार करण्यात आली.त्यामध्ये फिजीशियन, सर्जन स्त्रीरोग तज्ज्ञ,दंतरोग मुखरोग तज्ज्ञ,नेत्रतज्ञ यांचा समावेश होता. 21 ते 31 ऑगस्ट 2023 रोजी उमरगा, मुरुम,कळंब,तेर,वाशी,लोहारा व तुळजापूर तसेच चार दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे विभागनिहाय लाभार्थ्यांची तपासणी करुन सर्वांचे फॉर्म भरुन विविध तपासण्या विनामुल्य करण्यात आल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने कृती आराखडा तयार केलेल्या सत्रानुसार उमरगा,मुरुम,कळंब,तेर,वाशी, तुळजापूर व लोहारा अशा विविध ठिकाणी तपासणी केली.
उमरगा येथील शिबिराला डॉ.हेमलता रोकडे,डॉ.साईनाथ धुमाळ व डॉ.प्रभाकर बिचकटे या डॉक्टरांनी भेट दिली.शिबीरास 71 अंगणवाडी सेविका,मिनीअंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभाग नोंदविला. ज्यामध्ये नव्याने निदान झालेले प्रत्येकी चार रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह,जुने पक्षघातासारखे आजार असल्याने आढळून आले.
मुरुम येथे डॉ.दिपक निभोरकर, डॉ.शंतनु पाटील व डॉ.प्रभाकर बिचकटे या तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली.या ठिकाणी 11 महिलांना उच्च रक्तदाब व 7 महिलांमध्ये नव्याने मधुमेह असल्याचे निदर्शनास आले.तसेच 8 महिलांमध्ये संशयीत गर्भाशयाच्या पिशवीचे कर्करोग असल्याची लक्षणे दिसून आले.या ठिकाणी 128 महिलांची तपासणी करण्यात आली.
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबीरास डॉ.मोहन राऊत,डॉ.प्रविण डुमणे व डॉ.सुधिर आवटे यांची उपस्थिती होती.याठिकाणी एकूण 99 अंगणवाडी सेविका,मिनीअंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभाग नोंदविला ज्यामध्ये नव्याने निदान झालेले पाच रुग्ण उच्च रक्तदाब, दोन रुग्ण मधुमेह असलेले आढळून आले.
तेर येथे डॉ.प्रमोद लोकरे, डॉ.सौरभ पाटील,डॉ.सीमा मोहिते या डॉक्टरांनी भेट दिली.याठिकाणी 96 लाभार्थ्यांनी सहभाग सहभाग नोंदविला. यामध्ये मधुमेहाचे 10 नवीन रुग्ण, उच्च रक्तदाबाचे 5 रुग्ण आणि कर्करोगाचे संशयीत 3 रुग्ण आढळून आले.
वाशी येथे डॉ.दिपक निभोरकर,डॉ.सुधिर आवटे,डॉ.कृष्णा उंदरे-देशमुख यांनी भेट दिली. याठिकाणी 51 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मधुमेहाचे 6 नवीन रुग्ण, उच्च रक्तदाबाचे 9 रुग्ण आढळून आले.
तुळजापूर येथे डॉ.देशमुख, डॉ.गायकवाड, डॉ.सिमा मोहिते या डॉक्टरांनी भेट दिली. याठिकाणी 276 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये संशयीत कर्करोगाचा एक रुग्ण आढळून आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयामार्फत या शिबीरांतर्गत एकूण 1 हजार 254 अंगणवाडी सेविका,मिनीअंगणवाडी सेविका व मदतनीस यांची संपूर्ण तपासणी करण्यात आली.ज्यामध्ये एकूण 155 महिलांची तपासणी करण्यात आली. 35 महिलांना उच्च रक्तदाब, 30 महिलांना मधूमेहाचा आजार, 12 महिला संशयीत सीए कारविक्स,8 महिलांमध्ये स्तनाचे कॅन्सरसारखे लक्षणे आदी गोष्टी तपासणी शिबीरांतर्गत निदर्शनास आल्या. जिल्ह्यातून विविध रुग्णालयांतून 87 महिलांना विशेष उपचारासाठी उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले होते.
या शिबीरासाठी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संबंधीत जिल्ह्याचे बालविकास कार्यक्रम अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या समन्वयातून शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
0 Comments