दलबदलू नेत्यांच्या स्वागत, सत्काराची 'स्टंटबाजी' कशासाठी? -ॲड. शीतल शामराव चव्हाण
महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर होरपळत असताना, शेतकरी नापिकी आणि नुकसानीने हवालदिल झालेला असताना शक्तीप्रदर्शन व गाड्या-घोड्यांची रेलचेल कशासाठी?
पक्षांतराच्या निर्णयामूळे लोकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या लाटेला परतवण्यासाठी की पक्षांतर करुनही लोक आपल्यासोबत आहेत हे दाखवण्यासाठी?
सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्र सद्ध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर होरपळतो आहे. मार्च महिना उजाडण्याआधीच गावोगाव पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने ग्रामपंचायतींमार्फत विहिरींचे व पाण्याच्या स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. यंदा सोयाबीनला योग्य भाव मिळाला नाही. पाऊसच नसल्याने अनेकांनी रब्बीची पेरणीच केली नाही. ज्यांनी केली त्यांना पुरेसे उत्पन्न झाले नाही. शेतकरी पुरता मोडून पडला आहे. फायद्याचे सोडाच पण बी-बियणे, खत, रोजगारांची मजूरी, फवारणी, मशागत, काढणी इत्यादी लागलागूड म्हणून जो खर्च केला तोही निघाला नाही. एकीकडे शेतकरी असा गलितगात्र झालेला असताना दुसरीकडे येवू घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे पक्ष बदलणे आणि पक्ष बदलूनही लोक आपल्यासोबतच आहेत हे दाखवण्यासाठी शक्तीप्रदर्शन करणे अगदी जोमात सुरु आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष फोडले. पिढ्यानपिढ्या कॉंग्रेसचं काम करणाऱ्या नेत्यांना भीती व आमीष दाखवून पक्षात घेतले. अलिकडे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि माजी राज्यमंत्री बसवराज पाटील असे मातब्बर नेते अनेक वर्षांचे कॉंग्रेस पक्षासोबतचे ऋणानुबंध तोडून विरोधी विचारधारेच्या भाजप व भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षात सामील झाले.
एकीकडे जनता महागाई, बेरोजगारी, शेतीवरील संकटे, ढिसाळ आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था या सगळ्या समस्यांनी त्रस्त असताना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची, जनतेच्या वतीने सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी असलेली विरोधी पक्षातील दिग्गज नेते मंडळी जनतेसाठी लढण्याऐवजी पक्षांतर करुन सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात धन्यता मानत आहे. फोडाफोडीचे राजकारण, नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक, पोलिस स्टेशनमध्ये भाजपाच्या आमदाराने सर्वांसमक्ष केलेला गोळीबार, थंड डोक्याने झालेली घोसाळकरांची निर्घृण हत्या, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाची सत्तेतल्यांनी केलेली घोर फसवणूक, शेतमालाचा कोसळत जाणारा भाव या सगळ्याने महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
असुरक्षितता आणि अस्वस्थतेने बेचिराख झालेल्या जनतेत पक्षांतर करणाऱ्या, संधीसाधू आणि आप्पलपोट्या नेत्यांबद्दल प्रचंड खदखद आहे. या नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये असताना पक्षाला स्वत:च्या ढेळजा आणि वाड्यांपुरते मर्यादित ठेवले. सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका ठराविक पायरीच्यावर वाढू दिले नाही. पक्ष म्हणजे आपल्या हक्काची आणि हुकुमाची 'प्रायव्हेट लिमिटेड कंपनी' करुन टाकली. अनेक प्रसंगी स्वत:चे महत्व कमी होईल या भीतीने कॉंग्रेसमधील या सरंजामदारांनी आपल्याच पक्षातील उमेदवारांना काड्या करुन पराभूत केले. कॉंग्रेसची चलती असतानाच्या काळात शिक्षणसंस्था, साखर कारखाने, सहकारी संस्था काढल्या, विस्तारल्या आणि या संस्थांचा वापर आपल्या राजकारणासाठी, पैशांची उलाढाल करण्यासाठी केला. शेतकरी घाम गाळून, रक्त आटवून उस उत्पादन करतो आणि उस कारखान्याला घालतो म्हणून साखर कारखाने चालतात. पण साखर कारखानदार हे शेतकऱ्यांवर जणू उपकार करतात असा अविर्भाव निर्माण केला जातो. शैक्षणिक संस्थांना जनतेकडून कररुपाने सरकारने गोळा केलेल्या पैशातून अनुदान दिले जाते. या जनतेच्या पैशांवर शाळा चालतात. पण संस्थाचालक हे शिक्षकांवर उपकार केल्याच्या अविर्भावात शाळा, महाविद्यालयासाठी पगारावर नेमलेल्या मनुष्यबळाला आपले राजकारण रेटण्यासाठी राबवतात.
भाजपा सत्तेत आल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या आर्थिक नाड्या पकडल्या, त्यांचे भ्रष्टाचाराचे गैरप्रकार उघडकीस आणले पण दोषींवर कडक कारवाई करुन हे प्रकार रोखण्याऐवजी असे गैरप्रकार करणाऱ्यांना कारवाईची भिती दाखवून, विविध आमीश दाखवून आपल्या पक्षात सामील केले आणि एकप्रकारे भ्रष्टाचाराचे नियमीतीकरण भाजपाने केले.
कॉंग्रेसमधून भाजपात जाणारे, पक्ष फुटी करणारे नेते हे स्वार्थी, आप्पलपोटे, संधीसाधू आहेत हे जनतेला आता पुरते कळाले आहे. पक्षनिष्ठा, विचार बदलून स्वार्थासाठी रातोरात पक्ष, भूमिका बदलणाऱ्या नेत्यांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. पण पक्षांतर करणारे नेते या नाराजीच्या लाटेचा परिणाम आपल्या राजकारणावर होवू नये यासाठी पक्षांतर करुन आल्यावर स्वागताचे, सत्काराचे 'इव्हेंट्स' पूर्वनियोजित पद्धतीने घडवून आणत आहेत. जनता विविध प्रश्नांनी बेचिराख झालेली असताना पक्षांतर करुन आपण मोठा पराक्रम केला अशा अविर्भावात लाखो, करोडो रुपये खर्चून पुष्पवृष्टी, हारतुरे, रॅल्या, गाड्या-घोड्यांची रेलचेल केली जात आहे. आपण पक्षांतर करुनही जनता आपल्यासोबत आहे असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या सत्काराच्या, स्वागताच्या 'इव्हेंट'बाजीला आपले कारखाने, शिक्षण संस्था येथील कर्मचारी आणि आजवर आधीच्या पक्षाकडून उपभोगलेल्या पद, पैसा प्रतिष्ठेच्या बळावर कमावलेले हुकुमी मनुष्यबळ वापरले जात आहे.
पक्षांतर केले म्हणजे मोठा पराक्रम केला अशा थाटात करवून घेतल्या जात असलेल्या स्वागत, सत्काराच्या 'इव्हेंट'बाजीने जनता भुलणार नाही. स्वागत, सत्काराचे असे थाट दररोज जरी राबवले तरी जनतेच्या मनातील नाराजी पुसता येणार नाही. कारण, ज्यांच्या विरोधात निवडणूका लढवल्या त्यांच्याच गळ्यात गळे घालून मिरवणार असाल तर हा जनतेने तुम्हाला दिलेल्या मताचा, जनतेचा आणि पर्यायाने लोकशाहीचा पराभव तुम्ही करत आहात. असा पराभव जनता कधीही पचवून घेणार नाही.
रोम जळताना निरोने व्हायोलिन वाजवले होते. आज जनतेची बाजू कणखरपणे मांडत, विरोधक म्हणून लोकरक्षणार्थ सत्तेतल्यांची मस्ती उतरवण्यासाठी उभे ठाकण्याची वेळ आलेली असताना तुम्ही सत्तेपुढे लोटांगण घालत आहात, शरणागती पत्करत आहात. या शरणागतीचे, सत्तेपुढे हात टेकवल्याच्या मिंदत्वाचे स्वागत आणि सत्कार सोहळे भरवत आहात. जनता दुष्काळ, महागाई, नापीकीने बेचिराख झालेली असताना तुम्ही करवलेले हे स्वागत आणि सत्कार सोहळे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहेत. या भळभळत्या जखमा, त्यामागच्या वेदना जनता कायम स्मरणात ठेवेल हे ध्यानी असू द्यावे.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
0 Comments