Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिवच्या विजयाचे संपूर्ण श्रेय जनतेलाच; किंगमेकर' जनताच! - ॲड. शीतल शामराव चव्हाण

धाराशिवच्या विजयाचे संपूर्ण श्रेय जनतेलाच; किंगमेकर' जनताच! - ॲड. शीतल शामराव चव्हाण

जनतेनेच खरे 'ठग' कोण हे दाखवून दिले आणि जनतेनेच दिग्गज नेत्यांच्या 'फतव्यांना' केराची टोपली दाखवली.



काल देशाच्या सर्वोच्च निवडणूकांचा निकाल लागला. खरं तर लोकशाहीचे सौंदर्य, लोकशाहीचे महत्व आणि लोकांची ताकत दाखवणारा दिवस म्हणून कालच्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात व्हायला हवी. 'आम्ही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलो आहोत' अशा अविर्भावात वावरणाऱ्या राष्ट्रिय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पक्षाने तब्बल दहा वर्ष या देशात प्रचंड हैदोस घातला. नोटाबंदी, जीएसटीची जाचक कर आकारणी, धार्मिक उन्मादाला उत्तेजन, जनमानसातील देवा-धर्माबद्दलच्या श्रद्धेला राजकारणाच्या बाजारात आणून उभे करणे, भांडवलदारधार्जिने धोरण आखून देशाची नैसर्गिक साधनसंपत्ती उद्योगपतींच्या घशात घालणे, सार्वजनिक बॅंकांतला जनतेचा पैसा बड्या उद्योगपतींना खिरापतीसारखा वाटणे, चुकीचे आयात-निर्यात धोरण आखून शेतीक्षेत्राची आणि शेतकऱ्यांची वाट लावणे, शेतकरीविरोधी धोरणांचा मुकाबला करणाऱ्या आंदोलनांना क्रूरपणे चिरडणे, विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी स्वायत्त संस्थांचा मनमानी वापर करणे, सार्वजनिक मालकीचे उद्योग, जमीनी, संस्था आपल्या मर्जीतल्या उद्योगपतींना कवडीमोल भावात विकणे, मिडिया विकत घेवून तिचा मनमानी वापर करणे, शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुवादी, विषमतावादी विचार घुसडवणे, चित्रपटांसारख्या कलात्मक माध्यमांचा उपयोग आपला राजकीय प्रोपोगांडा लोकांवर बिंबवण्यासाठी करणे, संविधानिक मूल्ये पायदळी तुडवणे, न्यायालयांच्या स्वायत्ततेला धोका निर्माण करणे, विरोधकांना ईडी, आयटी, सिबीआयच्या धमक्या देवून स्वपक्षात सामील करुन घेणे, ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले त्यांना स्वत:च्या पक्षात घेवून 'क्लिन चीट' देणे, पक्ष-संघटना फोडून निवडणूक आयोगामार्फत पक्षाचे नाव, चिन्ह पळवणे अशा अनंत भानगडी संघ-भाजपप्रणित मोदी-शहा (मोशा) या जोडगळीने केल्याचे देशातील जनतेने पाहिले. एवढे सगळे करुनही देशाच्या १८ व्या लोकसभा निवडणूकांत भाजपा ४०० चा आकडा पार करेल अशा वल्गना केल्या गेल्या. बिकाऊ मिडियाच्या तथाकथित 'एक्झिट पोल'ने त्याला दुजोराही दिला. मध्ययुगातील राजेशाह्या ज्याप्रमाणे आमच्या हुकुमतीला दैवी अधिष्ठान आहे असे जनतेला भासवायच्या अगदी त्याचप्रमाणे २१ व्या शतकात, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात नरेंद्र मोदी हे खुद्द भगवान विष्णूचे अवतार आहेत असे जाहीररीत्या सांगण्यापर्यंत आणि आमच्या सत्तेला दैवी कृपा प्राप्त झालेली आहे असे भासवण्यापर्यंत भाजपाने मजल गाठली. मोदींची तुलना छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांशी करीत चक्क तशा आशयाची पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली. 

ॲड. शीतल शामराव चव्हाण

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष फोडण्यात आले. कॉंग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांची आयात भाजपाने केली. महाराष्ट्रातले अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवण्यात आले. कधीकाळी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदींच्या लबाडीची चिरफाड करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरेंना त्यांच्या इंजिनने 'महायुती'ची ट्रेन बिनशर्त ओढण्यास भाग पाडले. हक्काचे आरक्षण मागणाऱ्या मराठ्यांचे आंदोलन छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेवून अतिशय निर्लज्जपणे संपवण्याचा कट आखला गेला. 

देशात, राज्यात चाललेली ही एकाधिकारशाही जनता निमूटपणे बघत होती. जनतेच्या मनातील सुप्त संतापाची लाट लोकसभा निवडणूकांच्या निकालाने स्पष्ट झाली आहे. ४०० पार च्या वल्गना करणाऱ्या भाजपाला २५० चा आकडा गाठणेही मुश्किल झाले. तर कॉंग्रेसने मागच्या वेळपेक्षा जवळपास दुप्पट जागांवर बाजी मारली.

महाराष्ट्रात तर या लाटेने महायुतीची नैय्या बुडवून टाकली आहे. मागच्या वेळी केवळ एक खासदार असणाऱ्या कॉंग्रेसने दिग्गज म्हणवणारे नेते सोबत नसतानाही १० चा आकडा पार केलेला आहे. पक्ष फुटूनही, भल्या मोठ्या संख्येने पक्षाचे आमदार, खासदार पळवले जावूनही उद्धव ठाकरेंनी आपली मशाल पेटवली आहे तर शरद पवारांनी आपल्या तुतारीच्या आवजाने गगनभेदी ललकारी देण्याची कामगिरी केलेली आहे. आपला स्वाभिमानी कणा दिल्लीच्या तख्तापुढे झुकू न देण्याच्या गौरवशाली इतिहासाची आब महाराष्ट्राने अखेर राखली.

देशातल्या अतिमागास म्हणून नोंद झालेल्या धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघाने या परिवर्तनात नुसता भागीदार होण्याची नव्हे तर महत्वाचा शिलेदार होण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या मतदारसंघात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ओमराजे निंबाळकरांनी तब्बल तीन लाखांहून अधिक मतांची 'लीड' घेत महाराष्ट्रात विक्रम प्रस्थापित केलेला आहे.

धाराशिव मतदारसंघाची परिस्थिती ही काय देश आणि राज्यापेक्षा वेगळी नव्हती. मागच्या वेळी लोकसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढलेल्या आणि अनेक वर्ष त्या पक्षाच्या सत्तेची फळे चाखलेल्या राणाजगजितसिंह पाटलांना भाजपाने २०१९ सालीच आपल्या गोटात सामील करुन घेतले. भाजपातून अजित पवार गटात घेत त्यांच्या धर्मपत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांना घड्याळाच्या वतीने यावेळी उमेदवारी देण्यात आली. अर्चनाताई पाटलांच्या प्रचारासाठी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रविंद्र गायकवाड, नुकतेच भाजपात गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनिल चव्हाण, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, अजितदादांचे विश्वासू आणि निकटवर्ती सुरेशदाजी बिराजदार आदी दिग्गज नेत्यांची फौज होती. 

निवडणूकांच्या रणधुमाळीत एका पारड्यात भाजपाचे व भाजपाच्या मित्र पक्षांचे दिग्गज नेते, प्रचंड पैसा, प्रचंड मोठी यंत्रणा, गाड्या-घोड्यांचे ताफे, मोदींची शाही सभा आणि सत्ता होती तर दुसऱ्या पारड्यात फुटलेला पक्ष, नवे पक्षचिन्ह पण त्याजोडीला निष्ठा, ओमराजेंचा प्रचंड मोठा जनसंपर्क, पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांची निस्वार्थपणे लढण्याची भावना, संविधानवादी विचारांच्या लोकांची साथ आणि सर्वसामान्य जनता होती. निवडणूक प्रचारादरम्यान ओमराजेंवर व्यक्तिगत आणि खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यांच्या लोकसंपर्काला आणि लोकांचे फोन उचलून समाधान करण्याच्या कार्यपद्धतीला 'चिल्लर' लेखण्यात आले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ओमराजेंना 'ठग' म्हणून हिणवले,  आमदार तानाजी सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरताना भोवळ आलेल्या आमदार कैलास पाटलांना 'दिवस गेले की काय?' अशा खालच्या थरातला सवाल केला तर माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी उमरगा शहरातील प्रचाराच्या सांगता सभेत चक्क मुस्लिमांच्या दाढ्यांपर्यंत विषय नेत "उमरग्यात फक्त माझाच 'फतवा' चालणार" अशी दर्पोक्ती करण्यासह मशाल या पक्षचिन्हाची खिल्ली उडवली. नव्यानेच भाजपात गेलेल्या बसवराज पाटलांना जनतेतील मोदीविरोधी लाट दिसत नव्हती. उलट मोदींच्या घसरत्या काळात त्यांना अचानकपणे मोदी 'विकासपुरुष' आणि भारताला मजबूत सरकार देणारे एकमेव नेतृत्व वाटू लागले होते. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यावर नाराज होवून आपल्या पक्ष पदाचा राजीनामा देणाऱ्या सुरेशदाजी बिराजदारांना पक्ष फुटल्यावर मात्र अजित पवारांचा गट प्रिय वाटला. त्यांनीही निवडणूक प्रचारात 'मविआ' आणि ओमराजेंविरोधात भाषणबाजी केली. राणा दादा, त्यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांचीही भाषणबाजी गाजली. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची तर सभेत जीभ घसरली आणि त्यांनी सभेच्या मंचावरच शिवी हासडली. अशापद्धतीने सगळ्या दिग्गज नेत्यांची फौज ओमराजेंवर आणि पर्यायाने महाविकास आघाडीवर तुटून पडलेली असताना जनतेची फौज मात्र ओमराजेंच्या बाजूने प्रचंड ताकतीने, निस्वार्थ भावनेने आणि हा देश, या देशाचे संविधान वाचवण्याच्या जबाबदारीने उभी होती. लोकांमधला हा उत्स्फुर्त प्रतिसाद बघून मी निवडणूकांच्या आधीच दि.१९ एप्रिलला लिहिलेल्या लेखात धाराशिव मतदारसंघातील लोक आता स्वार्थासाठी पक्ष, निष्ठा, भूमिका आणि विचार बदलणाऱ्या नेत्यांना भीक घालणार नाहीत, त्यांचे ऐकणार नाहीत हे भाकीत मांडले होते. 'इथे माझाच फतवा चालतो' अशी दर्पोक्ती करणाऱ्या रविंद्रजी गायकवाड यांच्या विधानावरही 'उमरगा ही कुणाचीही खाजगी जहागीर नसून इथे कुणाचा फतवा नव्हे तर संविधानाचा कायदा चालतो' अशा मथळ्याखाली लेख लिहून जनतेच्या मनातील भावना व्यक्त केली होती. जनभावना लक्षात घेवून लेखणीच्या माध्यमातून मांडलेले भाकीत आणि लोकांच्या मनातील व्यक्त केलेली भावना लोकांनीच निवडणूक निकालाद्वारे  खरी करुन दाखवली याचा मनस्वी आनंद आहे.

*सत्तेच्या, पैशांच्या, दिग्गज नेत्यांच्या, अहंकाराच्या, असत्याच्या पारड्याला कवडीमोल करुन निष्ठेचे, न्यायाचे, नितीचे, सत्याचे, सर्वसामान्य जनतेच्या ताकतीचे पारडे वजनदार ठरले.* म्हणूनच धाराशिव मतदारसंघाच्या विजयाचे संपूर्ण श्रेय सत्तेच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने निस्वार्थपणे उभ्या ठाकलेल्या जनतेला जाते. निवडणूकीत एखादा उमेदवार निवडून आला की त्याला समर्थन देणाऱ्या दिग्गज नेत्यांना 'किंगमेकर' ठरवण्याची हुल्लडबाजी त्या-त्या नेत्यांचे भक्तगण करीत असतात. पण लोकशाहीत जनताच 'किंगमेकर' असते. धाराशिव लोकसभा मतदारसंघाने हे सिद्ध केले आहे. या निवडणूकीत खरे 'ठग' कोण हे जनतेनेच दाखवून दिले आहे. दिग्गज नेत्यांच्या फतव्यांना केराची टोपली दाखवत आता आम्ही सर्वसामान्य लोकच आमचे स्वत:चे सामूदायिक नेतृत्व करण्यासाठी सिद्ध झालो आहोत हेही जनतेने दाखवून दिले आहे. आता यापुढे आम्ही आमचे निर्णय घेण्यास सक्षम आहोत, आम्हाला तुमच्या स्वार्थी सल्ल्याची, मतलबी भाषणबाजीची गरज नाही हे जनतेने नेत्यांना निवडणूक निकालांच्या माध्यमातून सांगून टाकले आहे. मागास म्हणून नोंद झालेल्या देशाच्या या मतदारसंघातील जनता विचाराने, विवेकाने मात्र प्रचंड विकसित आहे, हेही सिद्ध झालेले आहे. 

या निवडणूकीत फक्त ओमराजेंचा अगर 'मविआ'चा विजय झालेला नाही तर हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा झालेला विजय आहे. सत्तेच्या विरोधात सत्याचा झालेला विजय आहे. हीच खरी परिवर्तनाची नांदी आहे. 

या निवडणूकीत 'मविआ'च्या प्रचारार्थ आणि संविधान वाचवणाच्या जबाबदारीचा भाग म्हणून उमरगा-लोहारा विधानसभा भागापुरता मीही सामील झालो होतो. प्रचाराच्या काळात महावीर कोराळे, ॲड. सुभाष राजोळे, बाबा पाटील, अश्लेषभैय्या मोरे, संजय पवार, महेश देशमुख, बाबुराव शहापूरे, रझाक अत्तार, बसवराज वरनाळे, सुधाकर पाटील, विजकुमार नागणे, रणधीर पवार, ॲड. दिलीप सगर, अशोकराजे सरवदे, विजय वाघमारे, ॲड. दिपक जवळगे, अमोल बिराजदार, डी. के. माने, अविनाश रेणके, ॲड. सयाजी शिंदे, व्यंकट भालेराव, आप्पाराव गायकवाड, विलास व्हटकर, संजय सरवदे, केशव सरवदे, जिडा सुर्यवंशी, प्रदिप जाधव, अजिंक्य पाटील, भगवान जाधव, विशाल कानेकर, नितीन कोराळे, ॲड. भैय्या शेख, आशीष जाधव, अभिषेक औरादे, महेश शिंदे आणि तळमळीने काम करणाऱ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्यासोबत वावरण्याचा तसेच या निवडणूकीतील या सगळ्यांच्या निस्वार्थ योगदानाचा अनुभव घेता आला.

निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या छोटेखानी भाषणांत मी कवी दुष्यंतकुमार यांच्या *"ले मशाले चल पडे है लोग मेरे गॉंव के, अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गॉंव के"* या ओळींचा उद्गार करीत असे. या ओळींतील विश्वास जनतेने खरा करुन दाखवला. आमच्या लोकांनी अंधकारावर मात करण्यासाठी हाती मशाल घेतली आहे, समतेच्या आणि विवेकाच्या विचारांची तुतारी फुंकली आहे हा विश्वास या निवडणूक निकालातून मिळाला आहे. आपण सगळे प्रकाशाचे वाटेकरी झाला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन आणि आभार!


© ॲड. शीतल शामराव चव्हाण

(मो. 9921657346)

Post a Comment

0 Comments