धाराशिव व सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या वाघाचे दर्शन घडले आहे यावर आधारित प्राध्यापक विशाल गरड यांनी अतिशय सुंदर लिहिलेले पत्र-
प्रिय वाघोबा,
तुझ्या येण्याने जणू शेकडो वर्ष पोरकं असलेल्या या येडशी अभयारण्याला बाप मिळाल्यासारखं वाटतंय. तुझी दहशत इथल्या प्रत्येक प्राण्यांना आणि माणसाला आहेच पण ही दहशत तर निसर्गनिर्मितच म्हणून तुझ्या दहशतीची भीती कमी पण कुतूहलच जास्त आहे. तुझ्या नसण्याने या बालाघाटच्या जंगलात माजलेली माकडे, कोल्हे, लांडगे, हरणे आणि रानडुकरे या सगळ्यांनाच तुझ्या येण्याने जणू धडकी भरली आहे. तुझ्या डरकाळीने हे जंगल आबाद होत आहे. जोवर आहेस तोपर्यंत वन्यप्राण्यांची मनसोक्त शिकार कर, सगळी तळी तुडुंब भरली आहेत त्यावरही फेरफटका मारून निवांत पोहण्याचा आनंद घे.
तू या देशाची किती अमूल्य आणि दुर्मिळ संपत्ती आहेस हे इथल्या सगळ्याच लोकांना माहीत नाही त्यामुळे ते तुला मारून टाकण्याची, गोळ्या घालण्याची अपेक्षा करतील पण तू त्यांचा राग मानू नकोस. आम्ही डोंगराशेजारील गावात राहणारी माणसे. त्या जंगलात गुरे ढोरे राखत निवांत हिंडणारी माणसे पण आता हे जंगल खऱ्या अर्थाने ज्याच्या मालकीचे आहे, ज्याची या जंगलावर जन्मजात सत्ता आहे असा तूच इथे आल्याने तुझ्या हद्दीत येण्याची हिम्मत आम्ही करणार नाहीत. शेवटी एवढेच सांगतो. तुझ्यापासून माणसाला जेवढा धोका आहे त्याहून जास्त तुलाच माणसांकडून धोका आहे म्हणून तूच जपून राहा बाबा. श्री.रामलिंग, श्री.निळकंठेश्वर आणि आई येडाईच्या या पुण्य जंगलात तुझे स्वागत आहे.
(तळटीप : त्याला इथे भरपूर शिकार आहे. त्यामुळे तो माणसांवर वगैरे हल्ला करणार नाही. पण जर तुम्हीच अति उत्साहाने त्याला डवचायला किंवा खवळायला जाल तर तो तुम्हाला फाडून खाईन. वन विभाग त्याला टिपेश्वरला (यवतमाळ) घेवून जाईल तेव्हा जाईल तोपर्यंत तो आपल्या जंगलाचा पाहुणा आहे. ज्या शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, शेळ्या तो खाईल त्या सगळ्यांची नुकसान भरपाई देणे वनविभागाचे आद्य कर्तव्य असणार आहे तेही ते पूर्ण करतीलच. फक्त सतर्क राहा आणि सुरक्षित राहा.)
विशाल गरड
२५ डिसेंबर २०२४, पांगरी
0 Comments