तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदीर रस्ता दुरुस्ती कामाच्या आदेशाला ठेकेदारांकडुन केराची टोपली
चिवरी/राजगुरु साखरे : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरुस्ती काम अत्यंत निकृष्ट होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता याचे वृत्त दैनिक पुण्यनगरीने प्रसिद्ध करताच संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदारास यात्रीपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते मात्र यात्रा अवघ्या बारा दिवसांवर आली असताना अद्याप पर्यंत तरी या रस्त्याची दुरुस्ती ठेकेदाराकडून केली नाही. तसेच रस्ता दुरुस्त करण्याच्या हालचालीही दिसून येत नाहीत. सदरील रस्ता कामाच्या दुरुस्तीचे आदेश देऊनही संबंधित ठेकेदाराकडून आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करून तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भाविकांसह ग्रामस्थातून होत आहे.
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मागील महिन्यामध्ये महालक्ष्मी मंदीर रस्ता झांबरे वस्ती ते साठवण तलाव पर्यंतचे रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे मात्र हा रस्ता अत्यंत निकृष्ट केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता याची दखल घेऊन संबंधित बांधकाम विभाग तुळजापूर येथील अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला यात्रीपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते,. मात्र सदर ठेकेदाराकडून सदर रस्त्याचे काम आदेश मिळाल्यापासुन फक्त रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून घेतल्याचे दिसून येत आहे मात्र दुरुस्तीचे आदेश असताना फक्त या रस्त्याची बोळवण साईट पट्ट्या भरूनच होणार का? असा संतप्त सवाल सुजान नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारला कोणाचे पाठबळ मिळत आहे अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे.यात्रेपूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
0 Comments