निळ्या नभातील लाल तारा - साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे लेखन :ऍड. शीतल शामराव चव्हाण

Hot Posts

6/recent/ticker-posts

निळ्या नभातील लाल तारा - साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे लेखन :ऍड. शीतल शामराव चव्हाण

निळ्या नभातील लाल तारा - साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे

लेखन :ऍड. शीतल शामराव चव्हाण



मराठी साहित्याच्या विश्वात, जिथे शब्द समाजाच्या काळजाला भिडतात, तिथे अण्णाभाऊ साठे यांचे नाव एक तेजस्वी तारा म्हणून चमकते. साहित्यरत्न, लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना आपण प्रेमाने, आदराने आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतो, हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते क्रांतिकारी विचारवंत, लढवय्ये नेते आणि दलित-शोषितांचा आवाज होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात झाला आणि १८ जुलै १९६९ रोजी गोरेगावच्या सिद्धार्थनगरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या अल्पशा आयुष्यात त्यांनी साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक चळवळी आणि वर्ग लढ्यांमधून अमिट ठसा उमटवला. त्यांचे साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे शस्त्र होते, ज्याने दलित आणि कामगार वर्गाच्या जीवनातील वास्तवाला आवाज दिला.

संघर्षातून साहित्याचा उगम

आण्णाभाऊंचे जीवन म्हणजे संघर्षाची एक महागाथा आहे. मातंग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंना जाती व्यवस्थेच्या क्रूर बंधनांचा आणि गरिबीच्या खाईचा सामना करावा लागला. त्यांचे शिक्षण अवघ्या दीड दिवसांचे; पण या मर्यादांना त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि सृजनशीलतेच्या जोरावर पार केले. शिक्षणाच्या अभावाने त्यांचे मन कधीच मागे पडले नाही. त्यांनी स्वत:च्या अनुभवांतून आणि निरीक्षणातून ज्ञान मिळवले. विविध चळवळीत काम करीत असताना ते वाचनशी जोडले गेले. त्यांनी प्रचंड वाचन केले. सातारा-सांगलीच्या ग्रामीण भागातून मुंबईच्या झोपडपट्ट्यांपर्यंत आणि तिथून रशियाच्या मॉस्कोपर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ भौगोलिक नव्हता, तर तो वैचारिक, चळवळीच्या दृष्टीने आणि सांस्कृतिकदृष्ट्याही प्रेरणादायी होता.

अण्णाभाऊंनी लहानपणीच गरिबी आणि सामाजिक बहिष्काराचा अनुभव घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालुबाई होते. कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी खस्ता खाव्या लागल्या. आण्णाभाऊंनी मजुरीपासून ते मुंबईच्या गिरण्या आणि बंदरातील कामापर्यंत सर्व प्रकारची कामे केली. या अनुभवांनी त्यांच्या लेखनाला एक खोलवरची संवेदनशीलता आणि वास्तवतेची धार दिली. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक शब्द हा त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा साक्षीदार आहे. त्यांच्या तीन अपत्यांपैकी एक मुलगा मधुकर आणि दोन मुली शांता व शकुंतला यांनीही त्यांच्या संघर्षमय जीवनाचा वारसा अनुभवला.

मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांना जोडणारा दुवा

आण्णाभाऊंच्या विचारसरणीवर कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा गाढा प्रभाव होता. मार्क्सवादाने त्यांना समाजातील आर्थिक विषमतेचे विश्लेषण करण्याची दृष्टी दिली, तर आंबेडकरवादाने जातीच्या शोषणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. या दोन विचारधारा त्यांच्या साहित्यात आणि कार्यात एकमेकांत गुंफल्या गेल्या. “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलित आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,” असे त्यांनी १९५८ मध्ये मुंबईतील पहिल्या दलित साहित्य संमेलनात ठणकावले. या विधानातून त्यांनी दलित आणि श्रमिक वर्गाचे सामाजिक-आर्थिक महत्त्व अधोरेखित केले.

"धर्मांधांनी अनंत छळले,

धनवंतांनी तसेच पिळले,

मगराने जणू माणिक गिळले,

चोर जाहले साव,

जग बदल घालूनी घाव,

सांगून गेले मला भीमराव..

या त्यांच्या ओळींतून त्यांनी श्रमिक-बहुजन समाजाला धर्मांध आणि धनवंत या दोन्ही शोषकांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेबांकडून घेण्याचा संदेश दिला आहे.

आण्णाभाऊंनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला, पण त्यांनी तो भारतीय संदर्भात मांडला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी शाहीर अमर शेख आणि द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी मोठा लढा दिला. त्यांनी ‘लाल बावटा पथक’ स्थापन करून लोकनाट्य आणि लोकगीतांच्या माध्यमातून सामाजिक जागृती केली. त्यांचे विचार प्रखर बुद्धिवादी, समतावादी आणि विश्वबंधुत्वावर आधारित होते. त्यांनी जाती-वर्गाच्या भेदांना मूठमाती देण्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला क्रांतीप्रवण करण्याचा प्रयत्न केला.


"लाल झेंडा घेवून हाती,

करावया इथे क्रांती

कामागरांची पिढी नवी

पाऊल टाकती

आण्णा भाऊ साठे म्हणे,

बदलूनी हे दुबळे जिणे,

होणार जे विजयी ते रण करिती


या ओळीनी कामगारांना लढण्याचे भान दिले. आण्णाभाऊंच्या साहित्याने नुसत्याच वांझ वेदना प्रसवल्या नाहीत तर त्या वेदनांच्या आगीने पेटून उठत विषमतेला जाळून खाक करण्याची प्रेरणा दिली.

साहित्य आणि समताधिष्ठित समाजनिर्मितिचा अजोड संगम

आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे मराठी साहित्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. त्यांनी सुमारे ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, ४० लोकनाट्ये, ११ पोवाडे, शेकडो लावण्या आणि गाणी लिहिली. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा ‘माणूस’ होता, विशेषत: समाजाच्या तळागळातील शोषित, पीडित आणि उपेक्षित वर्ग होता. त्यांच्या साहित्यातून स्वातंत्र्य, बंड आणि क्रांतीचा विचार प्रकट होतो. ‘फकिरा’ ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी, ज्याला १९६१ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला, मातंग समाजातील एका लढवय्या तरुणाच्या जीवनातील दुष्काळ आणि शोषणाविरुद्धच्या लढ्याचे चित्रण करते. या कादंबरीने दलित साहित्याला नवीन दिशा दिली.

आण्णा भाऊंच्या साहित्याने समाजातील अन्याय आणि विषमतेवर तीक्ष्ण भाष्य केले. त्यांच्या साहित्यात वास्तव, श्रमिक बहुजनांचा संघर्ष आणि लढण्याच्या प्रेरणेचा सुंदर मेळ आहे. ‘वैजयंता’, ‘आवडी’, ‘माकडीचा माळ’, ‘चिखलातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’ यांसारख्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांचे योगदान अधोरेखित केले. त्यांच्या साहित्याची पोहोच केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर ते रशिया, पोलंडसह २२ परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाले. मॉस्को येथे १४ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा पुतळा उभारण्यात आला, ही त्यांच्या वैश्विक प्रभावाची साक्ष आहे.

अण्णाभाऊंनी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (IPTA) च्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीला बळ दिले. ही संस्था भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सांस्कृतिक शाखा होती, आणि अण्णाभाऊ तिचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. त्यांनी लोकनाट्य, पोवाडे आणि लावण्यांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत क्रांतिकारी विचार पोहोचवले. *‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली’* ही राजकीय छक्कड सामाजिक जागृतीचे प्रतीक बनली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी शाहीरीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले आणि मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीला हातभार लावला.

दलित साहित्याचा पाया

अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे जनक मानले जाते. त्यांनी दलित समाजाच्या दुख:, वेदना आणि संघर्षांना साहित्यातून आवाज दिला. त्यांचे साहित्य केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर ते सामाजिक जागरूकतेचे आणि परिवर्तनाचे साधन होते. त्यांच्या लेखनातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या क्रूरतेवर, आर्थिक विषमतेवर आणि सामाजिक अन्यायावर तीव्र प्रहार केले. त्यांच्या साहित्यात विद्रोहाची धग आणि सत्यशोधनाची धार आहे. त्यांनी पारंपरिक पौराणिक कथानकांना बाजूला सारून वास्तववादी आणि क्रांतिकारी साहित्य निर्माण केले.

त्यांचे साहित्य आजही प्रासंगिक आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि संशोधक त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतात, आणि त्यांच्या जयंतीनिमित्त गावोगावी उत्साहात कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्या विचारांनी आणि साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्याने दलित समाजाला स्वाभिमान आणि संघर्षाची नवी दिशा दिली. त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि लोकनाट्यांनी समाजातील उपेक्षितांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली.

आण्णाभाऊंच्या साहित्याचा आणि विचारांचा प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या नावाने पुण्यात स्मारक, मुंबईत उड्डाणपूल आणि अनेक संस्थांना नावे देण्यात आली आहेत. १ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ ₹४ चे टपाल तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात १ ऑगस्ट २०१९ रोजी आणखी एक टपाल तिकीट जारी करण्यात आले. 

महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने ‘लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडळ’ स्थापन केले, जे मातंग आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्य करते. त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा जागर आजही सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय वर्तुळात केला जातो. त्यांचे साहित्य आणि विचार आजही समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतात.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक साहित्यिक, लढावय्ये नेते आणि क्रांतिकारी विचारवंत होते, ज्यांनी आपल्या लेखणीने समाजाच्या तळागळातील माणसाला सन्मान आणि स्वाभिमान मिळवून दिला. आण्णा भाऊंचे साहित्य हे केवळ शब्दांचे जाळे नव्हे, तर ती परिवर्तनाची ज्योत आहे, जी आजही समाजाला दिशा दाखवते. त्यांचे जीवन, विचार आणि कार्य हे मराठी साहित्य आणि समाजाच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. आण्णाभाऊंच्या विचारांचा जागर करणे आणि त्यांच्या साहित्याचा प्रसार करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या शब्दांतच सांगायचे तर, “पृथ्वी ही श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे,” आणि अण्णाभाऊंचे साहित्य हे त्या श्रमिकांच्या स्वप्नांचा आणि लढ्याचा अजरामर आवाज आहे.

© ऍड. शीतल शामराव चव्हाण

(मो. 9921657346)

Post a Comment

0 Comments