लोहारा : अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान, पंचनामे करून तात्काळ मदत द्या; लोहारा तालुक्यात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर शेतकऱ्यांच्या बांधावर
लोहारा /प्रतिनिधी रूपेश डोलारे : लोहारा तालुक्यातील मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याखाली गेलेल्या पिकांची आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभी केलेली पिके काही तासांतच पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, उडीद आणि इतर पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न पूर्णपणे कोलमडले आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खासदार राजेनिंबाळकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. पाण्याखाली गेलेली शेती, उद्ध्वस्त पिके आणि हताश चेहऱ्याने उभे असलेले शेतकरी पाहून त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या व त्यांना धीर दिला.
यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना ते म्हणाले, "शेतकऱ्यांचा प्रश्न हा संपूर्ण समाजाच्या उदरनिर्वाहाचा कणा आहे. शासनाने याकडे संवेदनशीलतेने पाहून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा." तसेच, "नुकसानग्रस्तांना दिलासा मिळेपर्यंत मी स्वतः पाठपुरावा करत राहीन, शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे," असे आश्वासनही खासदार राजेनिंबाळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार कोळेकर, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अविनाश देशमुख, अभिमन्यू देशमुख, शब्बीर शेख, प्रताप देशमुख, शिवराम देशमुख, विष्णू माने, बाळासाहेब देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments