धाराशिव : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वाशी हद्दीतील पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉज येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी लॉज मालक व अन्य 5 जणांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक पीडित तरुणी व महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाशी तालुक्यातील पारगाव येथील हॉटेल पृथ्वीराज बियर बार च्या वरच्या मजल्यावर लॉज सुरू आहे.या ठिकाणी सदरील लॉज मालक अवैध वेश्या व्यवसाय करत आहेत.अशी खात्रीलायक माहिती मिळताच दि.19 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजता करण्यात आलेल्या छापा कारवाईत दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक श्रीपती उत्तमराव घुले , कामगार महादेव विष्णू काळे, आणि 4 संबंधित ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
ही कारवाई वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार श्रीमती ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकून कारवाई केली. छाप्यादरम्यान देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ पीडित मुलींना मुक्त करण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांना मोठा धक्का बसला असून मानवी तस्करी व देहविक्रीविरोधात पोलिस प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

0 Comments