धाराशिव: श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न-
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक २ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानासोबतच ऐतिहासिक, भौगोलिक व सामाजिक जाणिवा अधिक समृद्ध व्हाव्यात, या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रथम महाबळेश्वर या प्रसिद्ध पर्यटनस्थळास भेट दिली. येथे जुने महाबळेश्वर, पवित्र महाबळेश्वर मंदिर तसेच आर्थर सीट पॉईंट, मंकी पॉईंट, मालकोन पॉईंट व टायगर स्प्रिंग पॉईंट अशा निसर्गरम्य ठिकाणांची पाहणी केली. डोंगररांगांतील सौंदर्य, धुक्याचे वातावरण व हिरवाईने विद्यार्थ्यांना विशेष आकर्षित केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी प्रतापगड किल्ला येथे भेट देऊन महादरवाजा, यशवंत बुरुज आदी ऐतिहासिक स्थळे पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. पुढे आरोली येथील गरम पाण्याचे झरे तसेच संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलेले ठिकाण व संभाजी वाडा पाहून विद्यार्थ्यांना मराठा इतिहासाची सखोल ओळख झाली. येथे श्री. वीर व्ही. व्ही. यांनी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना कशाप्रकारे फितुरीने पकडण्यात आले याविषयीचा इतिहास सांगितला.
सहलीच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांनी गणपतीपुळे येथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गणपती मंदिराचे दर्शन घेतले तसेच समुद्रकिनाऱ्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला, दांडी बीच, तारकर्ली बीच व सिंधुदुर्ग बीच या ठिकाणांना भेट देण्यात आली. जलक्रीडा, समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्य व ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्ण ठरली. सहलीचा समारोप कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या दर्शनाने करण्यात आला.
या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध भागांतील स्थानिक भोजनाचा आस्वाद घेतला. विविध ठिकाणच्या लोकांची जीवनशैली, हवामान, बोलीभाषा व स्थानिक बाजारपेठांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. प्रवासादरम्यान व मुक्कामाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, मनोरंजनात्मक खेळ तसेच समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेत सहल संस्मरणीय केली.
ही सहल एस. एस. सदाफुले, एम. एम. देशमुख, व्ही. व्ही. वीर, डी. एम. बंडगर, एस. एल. तेली, एस. एस. सुरवसे, शुभांगी माने, के. बी. मोहिते आदी शिक्षकांच्या नेतृत्वाखाली अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडली.
या सहलीसाठी संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, सीईओ आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी एस. एस. देशमुख, प्राचार्य एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य एस. के. घार्गे, पर्यवेक्षक एम. व्ही. शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञानच वाढले नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास, सामाजिक जाणिवा व ऐतिहासिक भान अधिक दृढ झाले. त्यामुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, अभ्यासपूर्ण व आयुष्यभर स्मरणात राहणारी ठरली.




0 Comments