विज्ञान जागृती अभियानाचा' पहिला उपक्रम मलंग विद्यालयात, सौर ऊर्जेच्या प्रयोगाचे सादरीकरण-Umerga Live
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण वाचनालयाचा उपक्रम
उमरगा (ता. 05): प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज व ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026 हा वर्ष "विज्ञान जागृती अभियान" म्हणून साजरा केला जाणार आहे. या अभियानाद्वारे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन करण्यासह काही प्रयोग दाखवले जाणार आहेत.
अभियानातील पहिला उपक्रम उमरगा शहरातील कै. शरणप्पा मलंग विद्यालयात सोमवार दि. 05 रोजी पार पडला. ऍड. शीतल चव्हाण यांनी विश्वानिर्मिती, विज्ञान, विज्ञानाच्या प्रमुख शाखा, ऊर्जा, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासह सौर ऊर्जेचे काही प्रयोग विद्यार्थ्यांना दाखवले. इतर ऊर्जेच्या स्रोतांपैकी सौर ऊर्जा कशी फायदेशीर, प्रदूषणमुक्त आहे हेदेखील पटवून देण्यात आले.
हे अभियान वर्षभर उमरगा व लोहारा या दोन्ही तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात राबवण्यात येणार आहे, अशी माहिती ऍड. शीतल चव्हाण यांनी दिली.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे, विज्ञान प्रशिक्षक परमेश्वर सुतार, वाचनालयाचे कार्यवाह किशोर बसगुंडे आदींची उपस्थिती होती.



0 Comments