जिल्हा परिषद निवडणूक होणार की पुढे ढकलणार? राज्य निवडणूक आयोग आज निर्णय घेणार-Zp Election Live Update
मुंबई - राज्यात १२ जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीला होणार की उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलली जाणार, याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग आज गुरुवारी घेणार आहे.
आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी निवडणूक पुढे ढकलली असल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. निवडणुकीशी संबंधित विविध बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
एरवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन ते चारच दिवस दिले जातात. यावेळी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार आहे. याचा अर्थ प्रचाराला सात दिवस देण्यात आले आहेत.
राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा ३० जानेवारीपर्यंत होणार नाहीत. तरीही प्रचारासाठी चार दिवस मिळणार आहेत. एवढा कालावधी प्रचारासाठी पुरेसा असल्याने निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजीच घ्यावी, असा विचार आयोग करत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचा प्रसंग या आधी उद्भवलेला नव्हता. असे पहिल्यांदाच घडत असल्याने सर्व बाबींचा विचार करून गुरुवारी निर्णय घेऊ, असे आयोगाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांच्या निधनाचे असेल प्रचारावर सावट
विशेषत: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारात कालपर्यंत होणारे आरोप-प्रत्यारोप, त्यातून येणारी कटुता प्रचाराच्या उर्वरित काळात दिसणार नाही. त्याऐवजी प्रचार भावनिक अंगानेच अधिक केला जाईल.

0 Comments