पीएम किसानचा 22 वा हप्ता 13 मार्चला; 32 लाख नवे शेतकरी पात्र, 9.32 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात 18,640 कोटी जमा-Pm Kisan 22nd Installment DBT New Update
मुबंई प्रतिनिधी / रूपेश डोलारे : देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा 22 वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, त्याआधीच शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
यावेळी सुमारे 32 लाख नवीन लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
32 लाख शेतकरी नव्याने पात्र
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत अनेक शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते, मात्र आधार सीडिंग, ई-केवायसी, जमीन नोंदी (Land Seeding) किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे त्यांना आतापर्यंत हप्ता मिळू शकला नव्हता.
तसेच काही प्रकरणांमध्ये जमिनीच्या वारसांची नोंद पूर्ण झाली नव्हती, त्यामुळेही अनेक शेतकरी लाभापासून वंचित होते. आता ही सर्व प्रकरणे मार्गी लावण्यात आली असून अंदाजे 32 लाख शेतकरी 22 व्या हप्त्यासाठी नव्याने पात्र ठरले आहेत.
9.32 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
13 मार्च रोजी होणाऱ्या हप्त्याच्या वितरणावेळी देशभरातील सुमारे 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ जमा केला जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 18,640 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
ही रक्कम Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या वाढणार
राज्यातील आकडेवारीनुसार, पीएम किसानचा 21 वा हप्ता महाराष्ट्रातील 90 लाख 42 हजार 241 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता.
मात्र आता 22 वा हप्ता वितरित होताना राज्यातील लाभार्थ्यांची संख्या 93 लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील अंतिम आकडेवारी राज्य कृषी विभागाकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजनेबाबतही हालचाल
दरम्यान, राज्यातील नमो शेतकरी महासन्मान योजना संदर्भातही शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेबाबत लवकरच राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यामुळे पीएम किसानसोबतच राज्यातील शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
👉 एकंदरीत, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता वितरणापूर्वी लाखो शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरत आहे.

0 Comments