PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ मार्च रोजी २२ वा हप्ता; देशातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केला जाणार आहे. या माध्यमातून देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत.
पंतप्रधान मोदी १३ ते १४ मार्च दरम्यान दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजनांची घोषणा करण्यात येणार आहे.
आसाम दौऱ्याची सुरुवात कोक्राझारमधून
पंतप्रधान मोदी आपल्या आसाम दौऱ्याची सुरुवात कोक्राझारमधील बोडो गडापासून करणार आहेत. या कार्यक्रमात ते ४,५७४ कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. तसेच बोडोलँड प्रादेशिक परिषद (BTC) क्षेत्रातील १,१०१ कोटी रुपयांच्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी कामाख्या–चारलापल्ली अमृत भारत एक्सप्रेस, नारंगी–अगरतळा एक्सप्रेस आणि गुवाहाटी–न्यू जलपाईगुडी एक्सप्रेस या तीन नवीन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
आसाम माला ३.० प्रकल्पाची घोषणा
या दौऱ्यात ३,२१७ कोटी रुपयांच्या आसाम माला ३.० प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ८८३ किलोमीटर रस्ते आणि ३६ नवीन पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे आसाममधील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी कोक्राझार येथे आयोजित जनसभेला देखील संबोधित करणार आहेत.
गुवाहाटीमध्ये ८,८४१ कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
कोक्राझार येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी गुवाहाटी येथे जाणार असून तेथे ८,८४१ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे.
तसेच ७८० कोटी रुपयांच्या नुमालीगड–सिलीगुडी पाइपलाईन क्षमता वाढ प्रकल्पाचे उद्घाटन देखील या दौऱ्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान चहा मळ्यातील कामगारांना जमिनीचे पट्टे वाटप करण्याचा विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता वितरित
याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता DBT द्वारे जमा करणार आहेत. या योजनेनुसार प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. हे पैसे २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३६ हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा
पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्यापोटी राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे १ हजार ८०८ कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
१४ मार्च रोजी सिलचरमध्ये मेगा प्रकल्प
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजी पंतप्रधान मोदी सिलचर येथे २२,८६४ कोटी रुपयांच्या मेगा सिलचर हाय स्पीड कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. हा प्रकल्प ईशान्य भारतातील पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
PM Kisan Samman Nidhi, Narendra Modi Assam Visit, PM Kisan 22nd Installment, DBT Transfer Farmers India, PM Modi Assam Projects, PM Kisan Scheme India

0 Comments