नळदुर्ग किल्ल्यावरून आईसह तीन मुलांची उडी; मायलेकाचा मृत्यू, दोन मुली गंभीर-
बुरुजावरून उडी घेतल्याची दुर्दैवी घटना; गंभीर जखमी मुलींवर धाराशिव शासकीय रुग्णालयात उपचार
धाराशिव , दि. ३ (प्रतिनिधी) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उपळी बुरुजावरून एका महिलेने आपल्या तीन मुलांसह उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत महिलेचा आणि तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला असून, दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी मुलींना तातडीने उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी मोहिते (रा. व्हंताळ , ता. उमरगा; सासर आंबुलगा, ता. निलंगा) असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. अश्विनी मोहिते या शालेय जीवनापासूनच कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू म्हणून परिचित होत्या.
आधी मुलाला खाली ढकलले, त्यानंतर स्वतः उडी
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी मोहिते यांनी आपल्या एका मुलाला प्रथम बुरुजावरून खाली ढकलले. त्यानंतर त्यांनी स्वतः उडी घेतली. याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या दोन मुलींनीही बुरुजावरून उडी घेतली. या दुर्घटनेत महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला, तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे नळदुर्ग आणि व्हंताळ आंबुलगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नळदुर्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

0 Comments