तुळजापूर : बसच्या धडकेत पादचारी ठार; तुळजापूर बसस्थानकाजवळ अपघात, बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल -Tuljapur Bus stand near Accident News
तुळजापूर : शहरातील तुळजाभवानी बसस्थानकाजवळ लातूर रोडवर झालेल्या अपघातात एका पादचारी व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 9 मार्च 2026) घडली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश माणिक कांबळे (वय 48, रा. सोलापूर) हे दि. 09 मार्च रोजी तुळजाभवानी बसस्थानक, लातूर रोड, तुळजापूर येथे पायी जात होते. त्यावेळी एमएच 06 बीडब्ल्यू 4339 क्रमांकाची बस चालक तुकाराम रावसाहेब कत्ते (वय 48, रा. बेलगाव ता. चाकूर जि. लातूर) यांनी आपल्या ताब्यातील बस हयगयीने व निष्काळजीपणे चालवून कांबळे यांना जोराची धडक दिली.
या धडकेत निलेश कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निलेश कांबळे हे तुळजापूर एसटी आगारात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणून कार्यरत होते ते कर्तव्यावर असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे या दुर्दैवी घटनेमुळे तुळजापूर बस स्थानक परिसरात शोक कळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली बहीण असा परिवार आहे.
या घटनेप्रकरणी वैभव प्रभाकर चेंढके (वय 29, व्यवसाय – नोकरी, वाहतूक निरीक्षक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, तुळजापूर आगार, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 281, 125 (अ), 125 (ब), 106 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस ठाणे करत आहेत.

0 Comments