खंडणी : 10 लाखांची खंडणी न दिल्याने संताप; 132 के.व्ही. वीज टॉवरचे खांब कापून 1.20 कोटींचे नुकसान-Naldurg Police Station Crime News
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मुर्टा शिवारात खंडणीच्या वादातून वीज पुरवठा यंत्रणेलाच लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 10 लाख रुपयांची खंडणी न दिल्याच्या रागातून आरोपीने थेट 132 के.व्ही. क्षमतेच्या वीज वाहक टॉवरचे लोखंडी खांब कापून तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखली भगवान पाटील (रा. मुर्टा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याने दि. 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजण्यापूर्वी मुर्टा शिवारातील शेत गट नं. 297/2 येथे फिर्यादी पार्थ जनकराव त्रिवेदी (वय 30, व्यवसाय – इलेक्ट्रिक इंजिनियर, मूळ रा. सुरेंद्रनगर, गुजरात, सध्या वास्तव लातूर) यांच्याकडे आणखी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली.
फिर्यादीने ही मागणी नाकारल्यास वीज टॉवर कापून नुकसान करण्याची धमकी आरोपीने दिली होती. धमकीनंतर आरोपीने प्रत्यक्ष कृती करत टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने उभारलेल्या 132 के.व्ही. क्षमतेच्या वीज वाहक टॉवर क्रमांक 21 चे चारही लोखंडी खांब गॅस कटरच्या सहाय्याने कापले.
घटनेच्या वेळी वीज लाईन सुरू असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. तसेच परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकला असता. हे माहित असूनही आरोपीने निष्काळजीपणे हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून वीज पुरवठा व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पार्थ त्रिवेदी यांनी दि. 23 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 110, 324(5), 125 तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम 139, 140 आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 4 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

0 Comments