कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन -Dharashiv News
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रहिवासी तसेच हिंगोली येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले विजयसिंह नलावडे (वय ४३) यांचे बुधवार, दि. २२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने प्रशासनिक क्षेत्रासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
विजयसिंह नलावडे हे आपल्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या अधिकारी म्हणून ओळखले जात होते. ग्रामविकास क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना तब्बल ३८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
ते ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्य कायदेशीर सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ झाला होता. प्रशासनातील त्यांच्या अनुभवाचा व कायदेशीर ज्ञानाचा मोठा फायदा संघटनेला झाला.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. २३ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार, सहकारी व ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निधनाने ग्रामविकास क्षेत्राने एक समर्पित व अभ्यासू अधिकारी गमावला आहे.

0 Comments