बेंबळी येथे ५ एप्रिलला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-Bembali
📍 धाराशिव | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक दिलासादायक उपक्रम म्हणून बेंबळी (ता. धाराशिव) येथे रविवार, ५ एप्रिल रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतकरी आणि कामगार कुटुंबीयांना या शिबिराचा मोठा लाभ होणार आहे.
हे शिबिर लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी, बेंबळी ग्राम विकास ट्रस्ट आणि उदयगिरी लायन्स आय नेत्रालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. बेंबळी येथील हेड्डा आडत दुकानाच्या हॉलमध्ये सकाळी १० वाजता शिबिरास प्रारंभ होणार आहे.
शिबिराचे उद्घाटन अरविंदअप्पा गिरवलकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गोविंदलाल हेड्डा असतील. यावेळी धाराशिवचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या शिबिरात उदयगिरी लायन्स आय नेत्रालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करणार आहे. तपासणीत मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची निवड करून त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी उदगीर येथील नेत्रालयात पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रुग्णांना ने-आण करण्याची व्यवस्था पूर्णतः मोफत करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे आयोजन जगदीश हनुमानदासजी हेड्डा यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी डॉ. श्रीनिवास पवार, डॉ. अविनाश गावडे, डॉ. सचिन ताडेकर, गणेश हेड्डा, उपेंद्र कटके, राजन गिरवलकर आणि श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा.

0 Comments