तुळजापूर: बेदरकार कारचालकाचा कहर;बारूळ येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी — कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल-(hit and run case)-Road Accident News
तुळजापूर : बेदरकार व निष्काळजी वाहनचालकामुळे आणखी एक जीवघेणा अपघात घडल्याची घटना तुळजापूर तालुक्यात समोर आली आहे. समोरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा एक युवक गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारचालक जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बसवराज लिंबराज मेनकुदळे (वय 34, रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव) हे दि. 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मोटरसायकल (क्र. MH 14 AG 1741) वरून प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या कार (क्र. MH 14 BR 1497) चालकाने आपली गाडी निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात बसवराज मेनकुदळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी मोटरसायकल (क्र. MH 25 AM 9145) वरील शिवराज माणिक भुजबळ (वय 30, रा. वडगाववाडी ता. लोहारा जि. धाराशिव) यांनाही कारने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर कारचालकाने मानवतेचा विसर पडत जखमींना उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मयताची पत्नी सोनाली बसवराज मेनकुदळे (वय 26, रा. बारुळ) यांनी दि. 23 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात संबंधित कारचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106, 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

0 Comments