रामकृष्ण हरीच्या जयघोषात दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवराम बुवा यांची पुण्यतिथी उत्साहात संपन्न
------------------------------------
हजारो भाविकांची उपस्थिती; भाकरी-अंबाडी भाजीच्या पारंपरिक महाप्रसादाने जपली अनोखी परंपरा.
-----------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे दिंडेगाव येथील श्री संत सद्गुरू शिवराम बुवा यांची पुण्यतिथी यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. "रामकृष्ण हरी"च्या अखंड जयघोषाने अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून हजारो भाविकांनी या पवित्र सोहळ्यास उत्स्फूर्त उपस्थिती लावली.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रावण वद्य पंचमी, मंगळवार (दि. १ सप्टेंबर) रोजी नांदुरी येथून पालखीचे दिंडेगावात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. त्यानंतर श्रावण वद्य षष्ठी, बुधवार (दि. २ सप्टेंबर) रोजी दुपारी २ वाजता गावातील ऐतिहासिक वडाच्या झाडाखाली भजन, हरिकीर्तन आणि काल्याचा धार्मिक सोहळा पार पडला.श्री संत सद्गुरू शिवराम बुवा यांचे सातवे उत्तराधिकारी गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते काल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ह.भ.प. विठ्ठल महाराज दिंडेगावकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर आणि हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुण्यतिथी सोहळ्यास तुळजापूर, उमरगा, औसा, सोलापूर, लातूर, धाराशिव, लोहारा आदी तालुक्यांतून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून संतांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाकरी, अंबाडीची भाजी आणि मिरचीचा ठेचा हा पारंपरिक महाप्रसाद. अनेक वर्षांपासून जपली जात असलेली ही परंपरा आजही कायम असून भाविक मोठ्या आनंदाने हा प्रसाद ग्रहण करतात.संध्याकाळी महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण सोहळा भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने दिंडेगाव परिसर भक्तिमय झाला होता.

0 Comments