मौजे निलेगाव येथे पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू.
-------------------------------------
जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या भावंडांवर काळाचा घाला; परिसरात शोककळा.
---------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) : तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव शिवारात जनावरांना पाणी पाजण्यासाठी पाझर तलावावर गेलेल्या दोन सख्ख्या शाळकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी घडली. अजय संतोष राठोड (वय १२) आणि रोहन संतोष राठोड (वय ११) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे निलेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय आणि रोहन हे दोघे भाऊ जनावरांना पाणी पाजण्यासाठी निलेगाव शिवारातील पाझर तलावावर गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही दोघे घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे वडील संतोष राठोड यांनी तलावाच्या दिशेने जाऊन मुलांचा शोध घेतला. यावेळी तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने अनर्थाची शक्यता व्यक्त करण्यात आली.त्यानंतर तलावात शोधमोहीम राबविण्यात आली. दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अजय हा सहावीत, तर रोहन हा पाचवीत शिक्षण घेत होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात दोन्ही भावांचा दुर्दैवी अंत झाल्याने गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-वडिलांचा आधार हरपला
दोन्ही मुलांच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने निलेगाव परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने संपूर्ण गाव हळहळले असून राठोड कुटुंबाच्या दुःखात ग्रामस्थ सहभागी होत आहेत.

0 Comments