मौजे इटकळ येथे लोकमंगल परिवाराच्या वतीने व्यावसायिक मार्गदर्शन बैठक.
----------------------------------------
उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांना आर्थिक बळ देण्यासाठी पुढाकार; माजी सहकारमंत्री सुभाष (बापू) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.
------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) :- परिसरातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना आर्थिक मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी तसेच शासकीय व संस्थात्मक कर्ज योजनांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने लोकमंगल परिवाराच्या वतीने ईटकळ येथे मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी व्यावसायिक मार्गदर्शन संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बैठक सकाळी १० वाजता ईटकळ येथील साई मंगल कार्यालयात होणार आहे. या बैठकीमुळे अणदूर, जळकोट, नळदुर्ग, काटगाव, ईटकळ आणि तामलवाडी परिसरातील उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक आर्थिक मार्गदर्शन मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या बैठकीस लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे आमदार मा. सुभाष (बापू) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन मा. बालाजी शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात मा. प्रा. मल्लिनाथ जळकोटे सर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.व्यवसाय करताना येणाऱ्या आर्थिक अडचणी, व्यवसायाचा विस्तार, आर्थिक नियोजन तसेच विविध कर्ज योजनांची माहिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या संवाद बैठकीत मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.परिसरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि नवउद्योजकांनी या बैठकीस उपस्थित राहून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमंगल परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments