धुळे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला! मशाल घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर-Dhule-Solapur National Highway Road Accident News
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथून गोळेगाव -गदाना (ता. खुलताबाद) येथे मशाल घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावरील चिंतेपिंपळगाव शिवारात रेड ॲपल फर्निचर दुकानासमोर शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता ही दुर्घटना घडली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मशाल घेऊन जात असताना अपघात
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक तुळजापूर येथून गदाना येथे मशाल घेऊन जात होते. मशाल घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी काही जण दुचाकीवरून मागे चालले होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या आयशर ट्रकने (एमएच २० सीएन ८०७४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात चार भाविक गंभीररीत्या जखमी झाले.
तिघांचा मृत्यू; एकावर उपचार सुरू
अपघातात अक्षय बिमलसिंग राजपूत (वय २८, रा. जाकेरवाडी), अमोल अशोक आवटे (वय ३०, रा. गडाना) आणि गोरख रावसाहेब मस्कर (वय ३०, रा. गडाना) यांचा मृत्यू झाला. तर शुभम नारायण आधाने (वय २०, रा. चिंचपूरवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर अक्षय राजपूत आणि अमोल आवटे यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गोरख मस्कर यांना चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
करमाड पोलिसांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि जमादार जयसिंग नांगलोत यांच्यासह करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेची माहिती घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त श्रद्धेने मशाल घेऊन निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भाविकांसह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

0 Comments