नळदुर्ग बायपासवर कंटेनरचा भाविकांना चिरडणारा भीषण अपघात! एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी-
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कर्नाटकातील भाविकांवर काळाचा घाला; जखमींना रुग्णालयात दाखल
नळदुर्ग (प्रतिनिधी) : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांच्या समूहाला कंटेनरने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. मुंबई–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ रायता हॉटेल परिसरात शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा भाविक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कर्नाटकातून तुळजापूरकडे पायी जात होते भाविक
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून भाविकांचा एक समूह तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी निघाला होता. हे भाविक मुंबई–हैदराबाद महामार्गावरून जात असताना नळदुर्ग बायपासजवळ हैदराबादहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच ०४ एनबी १६७२) तेथे आला.
यावेळी कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट पायी जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या धडकेत भाविक गंभीर जखमी झाले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
एकाचा जागीच मृत्यू; सहा जण गंभीर जखमी
या भीषण अपघातात गुरुसिद्ध बाबुराव कुंभार (वय ३० वर्षे, रा. बसवकल्याण) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा भाविकांच्या डोक्याला, हातांना आणि पायांना गंभीर दुखापती झाल्या.
जखमी भाविकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
अनुषा बी. रमेश (वय ३५, रा. हैदराबाद)
वीरेश हनुमंत कुंभार
वीरेश रुद्रमुनी चौधरी (वय २७)
संगमेश्वर बसवराज बेलुरे (वय ३३)
रोहन दशरथराव हंचाटे
महादेव रामलिंगप्पा मठपती
मडीवळप्पा चंद्रकांत जमादार (वय २६)
रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या मदतीने उपचार
अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच १०८ रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बहुतांश भाविक हे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण परिसरातील असल्याचे सांगण्यात आले. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी श्रद्धेने पायी निघालेल्या भाविकांवर अशी दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
महामार्गावरील भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
नवरात्रोत्सव आणि धार्मिक यात्रांच्या काळात तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी वाहने आणि रस्त्याच्या कडेला पायी चालणारे भाविक यांच्यात अपघात होण्याचा धोका असतो.
नळदुर्ग बायपासवरील या दुर्घटनेनंतर पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पायी दिंडी आणि भाविकांच्या समूहाजवळून जाताना विशेष खबरदारी घ्यावी, तसेच संबंधित यंत्रणांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

0 Comments