OTP, UPI PIN अन् अनोळखी लिंकपासून सावध राहा!
ऑक्टोबर ‘सायबर जनजागृती मास’; ऑनलाइन फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० वर संपर्क करण्याचे धाराशिव पोलिसांचे आवाहन
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्ह्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑक्टोबर २०२६ हा ‘सायबर जनजागृती मास’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, लिंक, फाईल, QR कोड तसेच सोशल मीडिया संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धाराशिव जिल्हा पोलिसांनी केले आहे.
सायबर ठगांकडून नागरिकांना विविध कारणे सांगून आर्थिक फसवणूक केली जात आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून OTP, UPI PIN, ATM PIN, CVV, पासवर्ड किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती मागितली जात असल्यास ती कोणत्याही परिस्थितीत देऊ नये. तसेच पोलीस अधिकारी, CBI, RBI अथवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल किंवा फोनद्वारे पैसे मागणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अनोळखी लिंक, APK फाईल व QR कोडपासून सावध
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक, APK फाईल, QR कोड, WhatsApp किंवा Instagram वरील अनोळखी व्हिडिओ कॉल यापासून सावध राहावे. मोबाईलमध्ये रिमोट अॅक्सेस मिळवून देणारे किंवा स्क्रीन शेअर करण्यास भाग पाडणारे अनोळखी अॅप्स इन्स्टॉल करू नयेत. अशा माध्यमातून सायबर ठग मोबाईल आणि आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.
ऑनलाइन नोकरी व गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका
घरबसल्या नोकरी, कमी वेळेत मोठा नफा, ऑनलाइन ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीत मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसवले जात असल्याने अशा ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्था अधिकृत आहे का, याची खात्री करावी.
सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० वर संपर्क
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ १९३० या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा तसेच अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तक्रार करताना मोबाईल क्रमांक, बँक खाते किंवा UPI संबंधित माहिती, Transaction ID/UTR, फसवणुकीची रक्कम, व्यवहाराची तारीख व वेळ आणि उपलब्ध स्क्रीनशॉट अचूकपणे देणे महत्त्वाचे आहे. तक्रार नोंदवल्यानंतर मिळालेला Reference/Complaint Number जतन करून ठेवावा, असे पोलिसांनी सांगितले.
फेक प्रोफाइल, ब्लॅकमेलिंग व सेक्स्टॉर्शनपासूनही सावध
सायबर स्टॉकिंग, फेक प्रोफाइल, अश्लील मेसेज किंवा फोटो, ब्लॅकमेलिंग तसेच सेक्स्टॉर्शनच्या प्रकारांना नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सोशल मीडिया वापरताना अनोळखी Friend Request किंवा Follow Request स्वीकारू नये. Privacy Settings योग्य ठेवाव्यात तसेच वैयक्तिक फोटो, कागदपत्रे आणि आर्थिक माहिती सार्वजनिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने पैसे मागणाऱ्यांपासून सावध
पोलीस, CBI, RBI किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे भासवून कायदेशीर कारवाईची भीती दाखवणे, व्हिडिओ कॉलवर चौकशी करणे आणि त्यानंतर पैसे भरण्यास सांगणे ही फसवणुकीची पद्धत असू शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या फोन कॉलला घाबरून पैसे पाठवू नयेत, असे पोलिसांनी नागरिकांना बजावले आहे.
संशयास्पद व्यवहाराची माहिती तात्काळ द्या
नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. फसवणूक झाल्यास विलंब न करता संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी. सायबर फसवणुकीनंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने तातडीने तक्रार केल्यास आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांना मदत होऊ शकते.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी किंवा सायबर क्राईमच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार करावी. तसेच अनोळखी किंवा आंतरराष्ट्रीय कॉल संदर्भात संचार साथीच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येते.
“घाबरू नका, सतर्क राहा; OTP, PIN, CVV आणि पासवर्ड कोणालाही देऊ नका. संशयास्पद ऑनलाइन व्यवहाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्या,” असे आवाहन धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments