अनैतिक संबंधाच्या कारणावरून २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! -Murder Crime News Dharashiv District
कुंथलगिरीच्या डोंगरात धारदार शस्त्र, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण; गोलेगाव परिसरात खळबळ
धाराशिव प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील गोलेगाव येथील २७ वर्षीय तरुणाची अनैतिक संबंधाच्या कारणावरून संगनमत करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामकुंड शिवारातील सरमकुंडी ते भूम जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या कुंथलगिरीच्या डोंगरात गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२६) दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद शिवाजी कागदे (वय २७, रा. गोलेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांना आरोपी शुभम सुभाष खोसे (रा. चांदवड, ता. भूम) आणि अंजली गोविंद कागदे (रा. गोलेगाव, ता. वाशी) यांनी संगनमत करून अनैतिक संबंधाच्या कारणावरून शिवीगाळ केली.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी गोविंद कागदे यांना लाथाबुक्क्यांनी, धारदार शस्त्राने तसेच दगडाने मारहाण करून त्यांचा जीव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास कुंथलगिरीच्या डोंगर परिसरात घडल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी ज्ञानेश्वर बाजीराव कागदे (वय ३९, रा. गोलेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी १९ नोव्हेंबर रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शुभम सुभाष खोसे आणि अंजली गोविंद कागदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे गोलेगावसह वाशी तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी विवाह, तरीही प्रेमसंबंध
विशेष म्हणजे गोविंद आणि अंजली यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, हा विवाह अंजलीच्या इच्छेविरोधात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अंजलीचे शुभम सुभाष खोसे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा आरोप आहे. या प्रेमसंबंधात पती गोविंद अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0 Comments