जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, आता मान्सूनची प्रतीक्षा |
धाराशिव: यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून रोहिणी नक्षत्र सुरू असल्याने शेतकरी सज्ज होऊन शेतीकामात मग्न झाला आहे. खरीप हंगाम पूर्व कामे जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नांगरणीसह मशागतीच्या कामास शेतकरी प्राधान्य देत आहे. शेणखत टाकणे, रोटावेटर करणे, नांगरणी अशा खरीप पूर्व मशागतीच्या कामास धाराशिव जिल्ह्यात वेग आल्याचे चित्र दिसत आहे .
रोहिणी नक्षत्राला प्रारंभ होऊन दहा ते बारा दिवसाचा कालावधी लोटला आहे, हवामान खात्याने वेगवेगळे अंदाज वर्तवली होते मात्र अद्याप तरी रोहिणी नक्षत्राचा समाधानकारक पाऊस पडला नाही. या नक्षत्रात पेरणी करण्याची बळीराजाची लगबग सुरू आहे. मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात दरवर्षी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होते. या नक्षत्रावर पेरणी केल्यास उत्पादन समाधानकारक मिळते असे जाणत्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
त्यानुसार खरीप हंगामातील पिकासाठी या नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी साधण्याची बळीराजाची लगबग सुरू आहे, तसेच शेती करता लागणारे साहित्याची देखील भाव वाढले असुन आर्थिक जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत येत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील हंगामामध्ये सोयाबीन ला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती , मात्र ती फोल ठरली. अनेकांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरात साठवण करून ठेवला, त्याचाही फायदा झाला नाही व शेतकऱ्याचा हिरमोड झाला आहे. व शेतकऱ्यांना सध्या पेरणीच्या तोंडावर सोयाबीन स्वस्त दरामध्ये विकावा लागत आहे.
0 Comments