सोनगीर येथील सहा तरुणांची एकाच वेळी भारतीय सैन्य दलामध्ये निवड !
धुळे: वाढती बेरोजगारी, वाढलेली महागाई, हाताला नसलेले काम यामुळे ग्रामीण भागात तरुणाई समोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र या सर्वावर मात करीत धुळे जिल्ह्यातील सोनगीर या गावांमधील सहा युवकांनी जिद्द, कठोर परिश्रम करून भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याची स्वप्न साकार केली आहे.
येथील सहा विद्यार्थ्यांची गांधीनगर गुजरात येथे झालेल्या सैन्य भरती मध्ये एकाच गावातील सहा युवकांची निवड झालेली आहे, ऑक्टोंबर मध्ये झालेल्या भरतीचा नुकताच निकाल लागला आहे या युवकांचे बीएसएफ मध्ये निवड झाली आहे. या सैन्य दलामध्ये भरती झालेल्या तरुणांच्या घरच्या परिस्थिती अत्यंत हलाखीच्या होत्या, यामध्ये सैन्य भरती मध्ये झालेला तरुण शैलेश नीलकंठ पाटील यांचे वडील दिव्यांग आहेत, तर आई शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. शैलेश हा आठ वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होता, असंख्य ठिकाणी वेटिंग लिस्ट मध्ये राहिला व मेडिकल पॉईंट मुळे फायनल लिस्ट मध्ये निवड झाली नाही, पण जिद्द कायम ठेवली, अभ्यासिकेत नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनदेखील करत गेला अखेर त्याच्या कठोर संघर्षाचे परिश्रमाचे फळ त्याला मिळाले. विशेष म्हणजे शैलेशची बीएसएफ, सीआयएफएससह एकाच वेळी तीन ठिकाणी निवड झाली आहे.
याचबरोबर सैन्य दलामध्ये भरती झालेले शरद भगवान गवळी यांचे पितृछञ हरपले आहे, तर आई व लहान भाऊ सोबत शेतातील मोल मजुरीचे काम करतात. तर शरद हा सोनगीर फाट्यावर हॉटेलमध्ये दिवसभर काम करायचा आणि रात्री अभ्यास करत असे. शरद आठ वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता, अखेर त्यांनी आपल्या जिद्दीने यशाला गवसणी घालून बीएसएफ मध्ये त्यांची निवड झाली आहे.
तसेच काशिनाथ शांतीलाल सूर्यवंशी यांचे देखील पितृछञ हरपले आहे, आई व लहान भावासोबत शेतातील मोलमजुरीचे कामे करून उरलेल्या वेळेत अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असे, त्यांच्या कठोर परिश्रमाने त्यांची देखील बीएसएफ मध्ये निवड झाली आहे.
याचबरोबर भावेश हरिदास बडगुजर, शिवम कैलास लोहार, शुभम नामदेव बडगुजर, हे तिघे वर्गमित्र असून त्यांचीही सैन्य दलामध्ये भरती होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. नियमित अभ्यास जिद्द कठोर परिश्रम या जोरावर यश कधीही खेचून आणू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण सोनगीर येथील युवकांनी प्रत्यक्षात करून दाखवले आहे, सोनगीर गावातील एकूण सहा युवकांची एकाच वेळी भारतीय सैन्य दलामध्ये यशस्वी निवड झाल्यामुळे कुटुंबाकडून ग्रामस्थांकडून युवकांचे अभिनंदन केले जात आहे, एकाच वेळी सहा युवकांची निवड झाल्यामुळे येथील युवकांच्या मित्रपरिवाराने गुलालाची उजळून करीत गावामध्ये आनंदोत्सव साजरा केला तर महिलांनी घरोघरी आरती करून तरुणाचे कौतुक केले.
0 Comments