दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानास धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरुवात.....
दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) काढून घेण्याचे आवाहन
धाराशिव : दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णयान्वये उस्मानाबाद जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक दि.6 जून 2023 रोजी घेण्यात आली. या बैठकीमध्ये दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी या योजनेची अंमलबजावणी करण्याकरण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस सचिव म्हणून जि.प. समाज कल्याण अधिकारी सुर्यकांत भुजबळ हे उपस्थित होते. तसेच पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गलांडे, शिक्षणाधिकारी आणि इतर प्रमुख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन पोर्टलवरती वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) मिळण्यासाठी नाव नोंदणी केलेली आहे मात्र अद्यापर्यंत तपासणी केलेली नाही अशा दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय परांडा, कळंब, तुळजापूर आणि उमरगा येथे तपासणीकरिता उपस्थित राहावे. तपासणी ही दर बुधवारी करण्यात येत आहे. तपासणी झालेल्या दिव्यांग व्यक्तींचे यु.डी.आय.डी. कार्ड त्यांच्या घरपोच मिळणार आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करुन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अशा व्यक्तींकरिता तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करुनही तपासणी करुन घेतलेली नाही अशा दिव्यांग व्यक्तींचे अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून करण्यात येईल. ऑनलाईन नांव नोंदणी केलेल्या व नव्याने ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी जवळच्या रुग्णालयांशी संपर्क साधून तपासणी करुन घेण्याचे आवाहन जि.प.चे प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले आहे.
0 Comments