मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद,दि.03 :- यावर्षी येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामास 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असे उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांनी आज येथे सांगितले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर, सुभाष कोळगे, बुबासाहेब जाधव, प्रा. डॉ.सतिश कदम, विवेक भोसले, मुरलीधर होनाळकर, भाऊसाहेब उमाटे आणि अरुण पवार, मराठवाडा मुक्ती संग्राम समितीचे जिल्हा अध्यक्ष युवराज नळे, ॲड.महेंद्र देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक, गणेश वाघमारे, रविंद्र शिंदे, राजाभाऊ करांडे, शीला वसंत उंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी श्री.भोर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष लागवड, स्वच्छता मोहिम, मॅरेथॉन, सायकल रॅली, प्रभात फेरी आणि शाळां आणि महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारित व स्वातंत्र्य लढ्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तिका तयार करण्यात याव्यात अशा सूचना केल्या. या अमृत महोत्सवात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, शाळा आणि शासकीय कार्यालयात पंचाहत्तर हजार वृक्षारोपण केले जातील. तसेच जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजन करण्याचेही सांगण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑडियो जिंगल्स तयार करावेत, घोषवाक्य तयार करावेत तसेच माहिती पट सादर करण्याचे नियोजन करण्यात यावे, जेणेकरुन जनसामान्यांना मुक्ती संग्राम काय होता याबाबत माहिती मिळेल. वनविभागाने 75 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांनी केल्या.
0 Comments