दूध दर वाढ करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन, महाराष्ट्र विकास सेना करणार ६ डिसेंबरला मुंबईत आंदोलन
माळशिरस : महाराष्ट्र राज्यातील प्रमुख विषयासंदर्भात ज्वलंत मागण्या घेवून महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मंत्रालयात जावून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्यात सरकारी शाळेचे होणारे खाजगीकरण त्वरित रद्द करण्यात यावे.बांधकाम कामगार कल्याण महामंडळ यांच्या मार्फत कामगारांना देण्यात येणारे जेवण बंद करण्यात आले आहे,ते तात्काळ चालू करण्यात यावे. महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ ग्रस्त तालुक्यातील जनतेला दुष्काळ संहिता २०१६ नुसार लाभ देण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील सर्व साखर कारखान्यांना चालू वर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल ३४०० रु.तर अंतिम दर ३८०० रु. देण्यात यावा यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. राज्यात दूध दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे ती रद्द करून दूध दर वाढविण्यात यावा.आशा मागण्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागण्यांवर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर ६ डिसेंबरला मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मविसे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
0 Comments