Hot Posts

6/recent/ticker-posts

अजितराव, तुमच्या विवेकाचे दिवे मालवले आहेत -ॲड. शीतल शामराव चव्हाण

अजितराव, तुमच्या विवेकाचे दिवे मालवले आहेत -ॲड. शीतल शामराव चव्हाण
समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रांतील संशोधने सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्था आणि त्यांचा विविध वर्गातील मानवी घटकांवर होणाऱ्या परिणामांचा वेध घेत असतात. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या नैसर्गिक शास्त्रांत्रील संशोधने निसर्गाच्या आणि माणसाच्या अस्तित्वाची सुत्रं उलगडून मानवी जीवनात तंत्रज्ञान, विविध सुविधा आणण्यास सहाय्यभूत ठरतात. साहित्याच्या माध्यमातून मानवी जीवनतील दु:ख, आनंद, व्यथा, वेदना, विडंबन, विनोद, उपहास, विरोधाभास व्यक्त होत असतो. अशा साहित्याची समीक्षा साहित्यातील संशोधनातून होत असते. मानवंशशास्त्र आणि इतिहास या विषयांतील संशोधनातून मानवी उत्पत्ती आणि मानवी जीवन प्रवासातील वेगवेगळ्या काळात झालेल्या घडामोडींची उकल केली जाते. या सर्व ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांमूळेच मानवी जीवन आजच्या प्रगत, सुसंकृत अवस्थेस पोहोंचले आहे. 

पण हे सगळे अजितराव पवारांना कसे कळणार? सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता एवढेच 'गणित' त्यांना कळते, तेच त्यांच्या अंगवळणी पडले आहे आणि ही शुद्र कसरत हीच त्यांच्या जगण्याची सर्वोच्च प्राप्ती आहे. त्यांच्या एकंदर जगण्यात एवढ्याच बाबींची उपयुक्तता आहे. त्यामूळे विविध ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधने अजितरावांच्यादृष्टीने कवडीमोलाची असावीत. म्हणूनच, " 'पी.एच.डी (Ph.D)' करणारे काय दिवे लावतात?"असा प्रश्न त्यांना पडतो. 'सारथी'च्या माध्यमातून पी.एच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांनाच 'फेलोशीप' दिली जाते. ही संख्या वाढवण्याच्या आमदार सतेज पाटील यांच्या मागणीवर अजितरावांनी हे वक्तव्य केलेले आहे. अजितरावांना 'पी.एच.डी. सारख्या फाल्तू गोष्टींवर राज्याच्या तिजोऱ्यांतून होणारा खर्च निष्फळ वाटणे स्वाभाविक आहे. कारण, 'फेलोशिप'सारख्या खर्चातून गुत्तेदाऱ्या, कंत्राटदाऱ्या, टक्केवाऱ्या अशा भानगडी करुन पैसे उकळता येत नाही. अजितरावांना जलसंधारण, रियल इस्टेट, रस्ते बांधणी, भुखंड, महसुल असे क्षेत्र आकर्षित करतात. कारण, अशा तथाकथित विकास कामांच्या प्रकरणांतून अब्जावधींचा मलिदा खाता येतो. काही भानगड झालीच, प्रकरण उघडे पडलेच तर पहाटेचे शपथविधी उरकुन 'क्लिन चिट' घेता येते. 'ई.डी.' च्या कारवाया होवू लागल्या की आधी केलेले सगळे पाप धुवून काढायला भाजपाकडून गोमुत्र शिंपडून घेता येते. एवढ्या सगळ्या तडजोडी करुन राजकीय विचारधारा मोडीत काढण्याची मुभा असणाऱ्या अजितरावांना 'पी.एच.डी.' सारखा विषय गौण वाटणे साहजिक आहे. कसलेच दिवे लावण्याची क्षमता नसणाऱ्या आपल्या दिवट्याला सहजासहजी लोकसभेची उमेदवारी देण्याची 'पॉवर' असणाऱ्या अजितरावांना 'पी.एच.डी.' च्या विद्यार्थ्यांची तळमळ कशी कळणार?

मागे एकदा अजितरावांनी 'धरणात पाणी नाही तर मुतू का?' असा सवाल शेतकऱ्यांना उद्देशुन केला होता. आता महाशक्तीसोबत असल्याने त्यांचा बेदरकारपणा अधिक धारदार झाला आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना हासडण्याची मजल थेट 'पी.एच.डी' करणाऱ्यांची अक्कल काढण्यापर्यंत गाठली आहे. दिर्घकाळ सत्ता हाती असल्याने अजितरावांच्या विवेकाचे दिवे मालवले आहेत. त्यावर वाम मार्गाने कमावलेल्या मालमत्तेच्या ढिगेची काजळी दाटली आहे. आता अजितरावांनी 'पी.एच.डी.' च्या विद्यार्थ्यांची नव्हे तर स्वत:च्या बौद्धिक कुवतीची चिंता करण्याची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे. 

अजितरावांचे काय करायचे हे जनता 'ई.व्हि.एम.' च्या खपटाआडचे 'दिव्याचे' बटन दाबून ठरवेलच. अजितरावांनी आपल्या विवेकाच्या मालवलेल्या दिव्याचे आणि राजकीय परिघात 'मावळ'लेल्या दिवट्याचे काय करायचे हे ठरवावे. 


© ॲड. शीतल शामराव चव्हाण

(मो. 9921657346)

Post a Comment

0 Comments