धाराशिव :जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसाला सुरुवात : येडशी येथील रामलिंग धबधबा ओसंडून वाहू लागला |
धाराशिव : यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील रामलिंग येथील धबधबा (Ramaling waterfall) ओसंडून वाहू लागला आहे. चारही बाजूला हिरवळ, डोंगर आणि त्यात वाहणारा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे. उंचावरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याची चाहुल पर्यटकांना लागली आहे. पर्यटकही रामलिंग धबधब्यावर गर्दी करताना दिसत आहेत. मागील आठवड्यापासून सतत होत असणाऱ्या पावसामुळे येथील रामलिंग धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे . विशेष यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धबधबा सुरू झाल्यामुळे पर्यटकांना हे दृश्य पाहण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगांच्या कुशीत श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान आहे. गर्द वनराईतील हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देणारा परिसर म्हणून हे नावारूपास येत आहे. येथील धबधबा हे भाविकांचे व पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असते. श्रावणात सर्वत्र हिरवळ असते आणि या ठिकाणची माकडांची वर्दळ विशेष लक्ष वेधून घेते. रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंती वास्तुशिल्पाचा व दगडीकामाचा अप्रतिम आविष्कार आहे.
येडशी या गावी बालाघाटाच्या कुशीत निसर्गरम्य पर्यावरणात रामलिंग मंदिर वसलेले आहे. जसा पावसाळा सुरू होतो तसे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पावसाळ्यात पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला असतो. रामलिंग या मंदिराच्या भोवती एक वळसा घालून जाणाऱ्या नदीमुळे हे पर्यटन स्थळ आणखीनच मनमोहक बनते. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रमुख पर्यटकांपैकी रामलिंग हे देखील पर्यटन स्थळ आहे. येडशी रामलिंग अभयारण्याचे मुख्यालय येडशी येथे असून हे अभयारण्य उस्मानाबाद शहरापासून २० किमी. व बीड शहरापासून 95 किमी. अंतरावर आहे. लातूर-बार्शी हा रस्ता याच अभयारण्यातून जातो.
अशी आहे अख्यायिका
प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या शोधासाठी फिरत असताना जटायू पक्ष्याचे व रावणाचे युद्ध या रामलिंग (Ramling) ठिकाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युद्धानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायूला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले. ते पाणी जटायू पक्ष्याला पाजले. तेथेच त्यांनी लिंगाची स्थापना करून शिवआराधना केली, अशी आख्यायिका आहे. मंदिर व परिसरात अनेक वर्षांपासून माकडांचे वास्तव्य आहे. मंदिराच्या सभोवती अडीच हजार हेक्टर परिसर वनखात्याच्या (Forest Department) देखरेखीखाली आहे. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे बाजूच्या जंगलात मोर, ससे, हरीण, लांडगे, रानडुक्कर, तरस यांसह विविध प्राणी व पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. या परिसरातील विविध दुर्मिळ औषधी वनस्पती हे जंगलाचे वैशिष्ट्य आहे.
0 Comments