/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते नरेंद्रजी बोरगावकर यांचे निधन

Hot Posts

तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते नरेंद्रजी बोरगावकर यांचे निधन


तुळजापूर: विधान परिषदेचे माजी सदस्य तथा तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते नरेंद्रजी बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र बोरगांवकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत विविध महत्त्वाची पदे भूषविली., धाराशिव व लातूर जिल्हा एकत्र असताना धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव या पदावर त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे आजही तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांना आदराचे स्थान आहे.

💐💐💐💐💐वादळातल्या नंदा दिपातील प्राणज्योत अखेर मालवली 💐💐💐💐💐.                        गेल्या सहा दशकापासून धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक समंजस नेता म्हणून नरेंद्र बाबुराव बोरगांवकर यांचे नाव सुपरिचित होते. स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाचे समर्पण करून आत्मबलिदानाचे अग्निदिव्य करणाऱ्या हुतात्मा बाबुराव बोरगांवकरांचे नरेंद्र बोरगांवकर हे द्वितीय सुपुत्र त्यांचा जन्म १३ जून १९३७ रोजी झाला आज वयाच्या  ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने जिल्हयात  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

हैद्राबाद येथे कायद्याची पदवी संपादन केलेल्या या व्यक्तीला नौकरी अथवा स्वतंत्र वकिली व्यवसाय करून खूप माया जमविता आली असती परंतू त्यांनी तसे न करता आपल्या पदवीचा उपयोग समाजकार्यासाठी व्हावा या हेतूने प्रेरित होऊन त्यांनी या कार्यास वाहून घेतले. सदैव लोकांसाठी झिजणाऱ्या नरेंद्र बोरगावकरांनी १९६२ साली राजकारणात प्रवेश केला. १९६२ ते १९७४ पर्यंत त्यांनी तुळजापूर पंचायत समिती सभापती म्हणून काम पाहिले. १९७० ते १९८१ पर्यंत त्यांनी धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहून त्यांनी पक्षाची प्रतिमा उजाळून पक्ष बळकट केला त्या कार्याची पावती त्यांना १९८२ ला धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्वरूपात मिळाली. १९८२ पासून राजकारण सत्यासाठी आणि त्यागासाठी  न राहता सत्ता आणि स्वार्थापलीकडे त्याची मर्यादा वाढत गेली. संघर्ष हे राजकारणाचे माध्यम ठरले , जाहिरातबाजी हे राजकारणाचे अंग बनले . पक्षापेक्षा स्वार्थ व सत्तेला महत्व देणाऱ्या लोकांनी राजकारणात प्रवेश केल्याने खरे बावनकशी सोने बाजूला फेकले गेले. कारण एप्रिल १९८९ मध्ये धाराशिव जिल्हा परिषद पुरोगामी लोकशाही दलाच्या प्रभावाखाली गेल्याने त्यांना अध्यक्ष पदाचा  त्याग करावा लागला . पण सेवेच्या माध्यमातून पक्षाशी इमान राखून जे काय करता येईल तेच आपले राजकारण करणारे धिरोदत्त वृत्तीचे नरेंद्र बोरगांवकर नावाप्रमाणे संयमी व गंभीर बनून सत्ता संघर्ष टाळून सर्वसामान्य लोकांचा सतत जनसंपर्क ठेवला त्यामुळे बोरगांवकरांचे निवासस्थान पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचे वारूळच बनले.

या कालावधीत त्यांनी मोठ्या कौशल्याने पक्षनिष्ठ व संघटित कार्यकर्त्यांची फळी व साखळी तयार करून जनमताला प्रमाण मानून स्थिर  राजकारणाचा खराखुरा पायंडा त्यांनी निर्माण केला. राजकीय कालावधीत राजकीय मंथनातून निर्माण झालेले कडवट जहर प्राशन केले व ते पचविले देखील . उदात्त आणि स्वच्छ मनाचा एक उदारमतवादी राजकारणी म्हणून ते सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींना परिचित झाले. तुळजापूरच्या उघड्या बोडक्या माळरानावर ऊसाचा शिरपेच खोवणारे तालुक्यातील मरगळलेल्या शेतकऱ्यांत संजिवनी निर्माण करणारे  आदरणीय नरेंद्र बोरगांवकर श्री. तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना नळदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष बनले. या काळात आमदार मधुकरराव चव्हाण , आमदार कै. सिद्रामप्पा आलुरे गुरुजी  आमदार कै. शिवाजीराव पाटील बाभळगांवकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती.


Post a Comment

0 Comments