⛔तुळजापूर /राजगुरु साखरे : महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक 2024 चे बिगल नुकतेच वाजले असून मंगळवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायलाही सुरुवात झाली आहे .तुळजापूर विधानसभा मतदारसंघात डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आमदार होण्यासाठी तयार आहेत तुळजापूर विधानसभेचे आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? तुळजापूर विधानसभेचा आमदार कोण होणार ? असा प्रश्न कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना पडू लागला आहे.
2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुरब्बी नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना धक्का देत बाजी मारली होती. पण आता येणाऱ्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ते आपली जादू कायम ठेवत आमदारकी कायम ठेवतात की नवीन कोणी आमदार या मतदारसंघाला लाभणार ? असा प्रश्न आता पडू लागला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा दोन गटांमध्ये लढाई असून महाविकास आघाडी कडून अद्याप पर्यंत उमेदवारी निश्चित झाली नाही, परंतु महायुतीकडून विद्यमान आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे उमेदवारी निश्चित झाली आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे नागरिकाचे लक्ष वेधले आहे.
एकीकडे महाविकास आघाडी कडून गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहेत यामध्ये काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अँड.धीरज पाटील हे आमदारकी लढवण्यास असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे, तसेच तालुक्यातील प्रबळ उमेदवार देवानंद रोचकरी हेही काँग्रेस प्रवेश करून तिकिटाची मागणी करण्यात उत्सुक आहेत. तर शेतकरी पुत्र अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी पण बऱ्याच दिवसापासून मतदार संघ पिंजून काढला आहे, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सज्जन राव साळुंखे, योगेश केदार हेही इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. तर शिवसेना उभाटा गटाकडून प्रतीक रोचकरी, तर वंचित कडून डॉ. स्नेहा ताई सोनकाटे यांचे उमेदवारी निश्चित झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांनी सुद्धा मागील महिन्यामध्ये इच्छुक असल्याचे बोलले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मतदार संघातील जनता कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार ? याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
0 Comments