शेतकऱ्यांनी योजनांच्या सुलभ लाभासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करा - जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांचे आवाहन
मोफत ओळख क्रमांक तयार करून मिळणार
शेतकऱ्यांनी सेतू केंद्राशी संपर्क करावा
टाळाटाळ करणाऱ्या केंद्र चालकांवर होणार कारवाई
धाराशिव दि.३० :शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच , हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच अॅग्रीस्टॅक ह्या संकल्पनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु झाली आहे.या योजनेव्दारे शेतकऱ्यांना ओळख ( फार्मर आयडी ) दिला जाणार आहे.
ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ,अचूक हवामान अंदाज,मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळणार आहे. तसेच पीक विमा योजनेचा लाभ घेणे सोपे होणार आहे.पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच डिजिटल पीक कर्ज मिळवणेही सोपे होणार आहे.
जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या दूरदृष्टी योजनेचा फायदा घेवुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी " शेतकरी ओळख क्रमांक ( Farmer ID ) " तयार करुन घ्यावेत.असे आवाहन जिल्हा धिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
सर्व गावांमध्ये यासाठी मोहिम राबविण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या ग्राम महसुल अधिकारी,कृषी सहाय्यक व ग्राम विकास अधिकारी यांचेशी किंवा नजीकच्या नागरी सेवा केंद्राशी ( CSC ) संपर्क साधुन मोफत " शेतकरी ओळख क्रमांक ( Farmer ID ) " तयार करुन घ्यावा.या कामाकरीता नागरी सेवा ( CSC ) केंद्र चालकास शासनाकडून मानधन देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही.
जर कामकाज करत असताना नागरी सेवा ( CSC ) केंद्र चालक टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा करत असल्यास त्याबाबतची तक्रार संबंधीत तहसीलदार यांचेकडे करावी.केंद्र चालक दोषी आढळल्यास संबधीत नागरी सेवा ( CSC ) केंद्र चालकाविरुध्द कारवाई करण्यात येईल.असे जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी कळविले आहे.
0 Comments